नागपूर: ‘हातमजुरी करून पोट भरायचे, हाच आमचा धंदा. कमावतो ते एकाच दिवसात संपते. शिल्लक म्हणून आमच्या हातात काहीच राहत नाही. कष्ट कराले घाबरत नाही, पण करोनामुळे हाताले कामही नाही. घर कसे चालवावे, हा मोठा प्रश्न आमच्यापुढे असताना तीन मुलींची जबाबदारी डोक्यावर आहे. घरात खडकूही नसताना मुलींचे लग्न लावून देणे हाच आमच्यापुढे पर्याय आहे’, अशी धक्कादायक कैफियत बालविवाहाच्या चौकशीदरम्यान पुढे आली.
नागपुरातील लष्करीबागसह उमरेड, काटोल, मौदा, कामठी या भागात गेल्या काही महिन्यांत बालविवाहाच्या ११ घटना पुढे आल्या. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या चमूने हे बालविवाह रोखले. अचानक बालविवाह का वाढले, याबाबत चौकशी करण्यात येत असून यातील काही घटनांमध्ये पालकांनी सांगितलेल्या माहितीने चौकशी अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. करोनामुळे आर्थिक संकटाचा मार बसलेल्या या पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलीच्या बालविवाहाचाच मार्ग निवडल्याने केवळ कारवाई करून हा प्रश्न सुटत नाही तर त्यावर व्यापक तोडगा कसा काढायाचा, याबाबत आता विचारमंथन सुरू झाले आहे, अशी माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी दिली.
हवे आर्थिक स्थैर्य शिक्षण असो की इतर कुठलेही क्षेत्र, मुली मुलांपेक्षा सरस ठरत असल्याचे चित्र आहे. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढत असल्याचे सकरात्मक चित्र असतानाही अल्पवयीन मुलींचे विवाह लावून देण्यात येत आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अन्वये विविध कलमांन्वये अल्पवयीन मुलींचे लग्न लावून दिले जात असतील तर दोन वर्षे कारावास आणि दंडाची तरतूद आहे. मुलीचे आई-वडील किंवा इतर नातेवाईक यांनाही शिक्षा होऊ शकते. बालविवाहात सहभागी झालेल्यांनाही शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात आहे. या कारवाईसोबत आता आर्थिक स्थैर्य येईल, अशी व्यवस्थाही निर्माण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
गेल्या काही महिन्यांतील घटना
-६ मार्च २०२१ रोजी जिल्ह्यातील नागपूर ग्रामीणमध्ये १६वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला
-जुलै २०२०मध्ये उमरेड तालुक्यात दोन बालविवाह रोखण्यात आले.
-ऑगस्ट २०२०मध्ये कामठी तालुक्यात दोन बालविवाह रोखण्यात आले.
-नोव्हेंबर २०२०मध्ये काटोल तालुक्यात दोन बालविवाह रोखण्यात आले.
-जानेवारी २०२१मध्ये मौदा येथे बालविवाह रोखण्यात आला.
-जानेवारी २०२१मध्ये शहरातील लष्करीबाग येथे बालविवाह रोखण्यात आला.
-८ मार्च २०२१ रोजी मौदा तालुक्यातील कोदामेढी येथे बालविवाह रोखण्यात आला.
-१९ मार्च २०२१ रोजी कामठीत बालविवाह रोखण्यात आला. तो २० मार्चला होणार होता.