नागपूर, ता. २२ : ‘कोरोना’ संदर्भातील माहिती देण्यासाठी आणि घेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने उघडलेला नियंत्रण कक्ष आणखी सक्षम करण्यात आला असून २४ तास या कक्षाशी नागपूरकरांना संपर्क साधता येणार आहे.
‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मनपाने आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिक सक्षम आणि अद्ययावत केला आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, नागपूर महानगरपालिक छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर हा कक्ष सुरू करण्यात आला असून येथे २४ तास कोरोना संदर्भातील माहिती देणारे डॉक्टर उपस्थित राहतील. कोरोनासंदर्भातील आपल्या शंकाचे समाधान या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून करता येईल. यासोबतच कोरोना संदर्भात कुणी रुग्ण आपल्या निर्देशनात येत असेल तर त्याबाबतही या नियंत्रण कक्षाला माहिती देता येईल. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६७०२१ आणि ०७१२-२५५१८६६ असा आहे.
‘लॉक डाऊन’ दरम्यान नागरिकांच्या सुविधा बाधित होऊ नये म्हणून पाणीपुरवठा आणि मलनि:सारण संदर्भातील जर तक्रारी असतील तर त्यासाठी स्वतंत्र कक्ष आणि दूरध्वनी क्रमांक आहे. याविषयीच्या तक्रारींसाठी ०७१२-२५३२४७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.