नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. यात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे आठ लाखांच्या आसपास आहे. यातील जवळपास ३ लाख ९० हजार लोकांना लसीचा पहिला डोज दिला आहे, तर दुसरा डोस ४४ हजार ४७१ लोकांनी घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस दिली जाणार आहे. नागपूर शहरात अशा लोकांची संख्या १९ लाखांहून अधिक आहे. या आधिचे टार्गेट ६० टक्केहून अधिक पूर्ण झाले आहे, असा मनपाचा दावा आहे. तर एकूण ३० लाख लोकसंख्येचा विचार करता १२ टक्के लसीकरण झाले आहे.
लसीचा पुरेसा साठा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने लसीकरणावर परिणाम झाला आहे. सध्या २० हजार डोस उपलब्ध आहे. १८ वर्षांवरील सर्वांना लस द्यावयाची झाल्यास केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा वाढवावा लागेल. सोबतच मनपाला लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी लागणार आहे.
तर दररोज द्यावे लागतील २७ हजार डोस
१८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. नागपूर शहरात या वयोगटातील लोकांची संख्या १९ लाख ७८७ इतकी आहे. यातील ३ लाख ९० हजार लोकांना लस दिली आहे. उर्वरित १६ लाख १० हजार लोकांना लस देण्याचे टार्गेट सहा महिन्यात पूर्ण करावाचे झाल्यास दररोज २७ हजार लोकांना लस द्यावी लागेल.
शहराची लोकसंख्या – ३० लाख
१८ वर्षांवरील लोकसंख्या -१९ लाख ७८७
स्त्री-९२०७१२
पुरुष-९७९९९५
तीन दिवसांचा साठा
शहरातील १२२ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रांची क्षमता दररोज २० हजारांहून अधिक आहे. परंतु लसीचा पुरेसा साठा नसल्याने मागील काही दिवसांत लसीकरण कमी होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी १६ हजारांवर गेलेला लसीकरणाचा आकडा या आठवड्यात सात हजारांवर आला आहे. त्यानुसार तीन दिवस पुरेल इतकाच लस साठा उपलब्ध आहे.
४५ पेक्षा जास्त वयाचे ६० टक्क्यांहून अधिक लसीकरण
शहरातील लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. यात ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्यांची संख्या ८ लाख आहे. यातील ३ लाख ९० हजार लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. याचा विचार करता जवळपास ६० टक्के लसीकरण झाले आहे, तर एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के लसीकरण झाले आहे. लसीचा पुरेसा साठा नाही. सोबतच नागरिकांचाही अपेक्षित प्रतिसाद दिसत नाही.
१.५१ लाख ज्येष्ठांचे लसीकरण
नागपूर शहरात ६० वर्षांवरील नागरिकांची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. परंतु आजवर १ लाख ५१ हजार ज्येष्ठांनी लसीकरण केले आहे. लसीकरणाला ज्येष्ठांचाही अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.
४४,४७१ जणांनी घेतला दुसरा डोस
पहिला डोस घेतल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी दुसरा डोस दिला जातो. आजपर्यंत ४४ हजार ४७१ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. पुढील काही दिवसात ही संख्या वाढणार आहे.
लसीकरण केंद्रात वाढ करावी लागेल
नागपूर शहरात सध्या १२२ लसीकरण केंद्र सुरू आहे. दररोज २४ ते २५ हजार डोस देण्याची क्षमता आहे. १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी लसपुरवठ्यासोबतच गरज भासल्यास शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे.