‘ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये वर्णद्वेष सहन केला’ मुस्लीम क्रिकेटपटूचा खुलासा

cricket

ओली रॉबिन्सनचे (Ollie Robinson) प्रकरण ताजे असतानाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये आपल्याला वर्णद्वेषाचा अनुभव सहन करावा लागला असा गौप्यस्फोट ऑस्ट्रेलियाकडून आठ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या बॅट्समननं केला आहे.

सिडनी, 5 जून : इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) 8 वर्षांपूर्वी केलेल्या वादग्रस्ट ट्विटमुळे सध्या वादात सापडला आहे. रॉबिन्सननं आठ वर्षांपूर्वी वर्णद्वेषी आणि लिंगभेदी ट्विट केले होते. यामुळे त्याच्यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) कारवाई करण्याची शक्यता आहे. रॉबिन्सनचे प्रकरण ताजे असतानाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये आपल्याला वर्णद्वेषाचा अनुभव सहन करावा लागला असा गौप्यस्फोट ऑस्ट्रेलियाकडून आठ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या बॅट्समननं केला आहे.

पाकिस्तानात जन्मलेला उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) हा ऑस्ट्रेलियाकडून खेळलेला पहिला मुस्लीम खेळाडू आहे. त्याने 2011 साली सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. तो 2019 मध्ये शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला आहे. ख्वाजानं ‘इएसपीएन क्रिकइन्फो’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याचा अनुभव सांगितला आहे.

“आता परिस्थिती खूप चांगली आहे. मी लहान होतो त्यावेळी मला ऑस्ट्रेलियाकडून कधीही खेळता येणार नाही, हे अनेकदा ऐकलं होतं. मी टीमसाठी फिट नाही. ते माझी कधीही निवड करणार नाहीत, अशी ती मानसिकता होती. आता परिस्थितीमध्ये बदल होत आहे.

मी आता ऑस्ट्रेलियात राज्य पातळीवर असे अनेक क्रिकेटपटू पाहतो. त्यांची पार्श्वभूमी ही भारतीय उपखंडामधील आहे. मी क्रिकेट खेळायला सुरू केले तेव्हा तसे नव्हते. मी देशांतर्गत क्रिकेट खेळत होतो त्यावेळी मी एकटाच उपखंडातील खेळाडू होतो. आता कदाचित ही संख्या वाढली आहे.” असे ख्वाजाने सांगितले.

ऑस्ट्रेलियाकडून 44 टेस्ट आणि 40 वन-डे खेळलेल्या ख्वाजानं त्याच्या टीमला इंग्लंडकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. इंग्लंडच्या वन-डे टीमचा कॅप्टन आयर्लंडचा इयन मॉर्गम आहे. त्यांचा मुख्य फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर बार्बाडोसचा आहे. मोईन अली आणि आदिल रशीद हे पाकिस्तानी वंशाचे आहेत. तर बेन स्टोक्सचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला आहे.

“आम्हाला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. मी इंग्लंडकडे पाहतो तेव्हा त्यांच्या टीममध्ये बऱ्याच काळपासून विविधता आहे. ऑस्ट्रेलियाला त्याचे अनुकरण करण्याची गरज आहे. मी तरुण खेळाडू होतो तेव्हापेक्षा आता परिस्थिती बदलली आहे. हा एका पिढीचा बदल आहे,” असे ख्वाजाने सांगितले.

ख्वाजाचा जन्म इस्लामाबादमध्ये झाला. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला असून त्याने ऑस्ट्रेलियन नागरिकत्व घेतले आहे. सध्या तो दक्षिण आशियाई खेळाडूंना अधिक प्रतिनिधित्व मिळावं यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) सोबत काम करत आहे.