नागपूर : पाचपावलीतील कुख्यात गुंड मध्यवर्ती कारागृहातून सुटताच तीन आरोपींनी त्याचा दगडाने ठेचून ‘गेम’ केला. या हत्याकांडानंतर पाचपावली पोलिसांनी आठ तासात आरोपींना अटक केली. पांड्या ऊर्फ गौरव पिल्लेवान (वय ३०, रा. लष्करीबाग) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. हत्याकांडात तीन आरोपींना अटक केली असून त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करीबाग येथील रहिवासी असलेल्या पांड्याने पंधरा दिवसापूर्वीच योगीराज धनविजय (३५,राणी दुर्गावती चौक), विशाल उर्फ चिंटू विश्वकर्मा (३८,नया नकाशा) तसेच गोलू अंकुश मंडाले (२१, लष्करीबाग) आणि त्याच्या सहकाऱ्यांशी वाद घातला होता. शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास पांड्या शनिचरा बाजारातील पुराना कॅरम क्लबजवळ आला. त्याठिकाणी उभ्या असलेल्या ऑटोचालकांशी वाद घालू लागला. पांड्याच्या रोजच्या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या योगीराज, गोलू, विशाल आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी पांड्याला दगड आणि चाकूने भोसकून रक्तबंबाळ केले व पळ काढला. पोलिसांनी या घटनेतील इतर पाचही आरोपींना अटक केली. या प्रकरणी फिर्यादी मनिष बाबूराव पिल्लेवान (३३) च्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
आरोपी पोहचला ठाण्यात
खून केल्यानंतर सर्व आरोपी पळून गेले. तर योगीराज धनविजय हा रक्ताने माखलेल्या कपड्यासह पाचपावली पोलिस ठाण्यात पोहचला. त्यांने पांड्याचा खून करून आल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून अन्य दोन आरोपी विशाल आणि गोलू यांनाही पोलिसांनी अटक केली.
अधिक वाचा : नागपूर पोलिसातही ‘मी टू’ : पोलीस निरीक्षकाविरुद्ध महिला कर्मचाऱ्याची तक्रार