नागपूर : बेवारस कुत्रे पकडण्याकरिता महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना दीड हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. विलास श्रीरामजी चरडे (४८) आणि सुरेश कृष्णराव डांगे (५३), अशी आरोपींची नावे आहेत. विलास आरोग्य विभागात ऐवजदार तर सुरेश हा यांत्रिकी विभागात ऐवजदार वाहनचालक आहे. तक्रारकर्ते नागपूर येथील रहिवासी असून महापालिकेत नोकरी करतात.
प्रभाग क्रमांक 8 मधील टिमकी, दादरा पुलाजवळील खुल्या जागेमध्ये बसलेल्या कुत्र्यांना पकडण्यासाठी तक्रारकर्त्याने मंगळवारी गांधीबाग झोन क्रमांक 6, कार्यालय येथे अर्ज केला. दिलेल्या अर्जाबाबत ते विलास आणि सुरेश यांना भेटले. त्यांनी दादरा पुलाजवळील खुल्या जागेमध्ये बसलेल्या कुत्र्यांना पकडण्याकरिता तक्रारकर्त्यास अडीच हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.
विभागाच्या पथकाने बुधवारी सापळा रचून विलास आणि सुरेश यांनी कुत्रे पकडण्याकरिता अडीच हजार रुपयांची मागणी केली. परंतु त्यांनी दीड हजार रुपयांमध्ये तडजोड करून ही रक्कम स्वीकारली. या आरोपींविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागाचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुदलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, पोलीस हवालदार वकील शेख, रविकांत डहाट, दीप्ती, रेखा यादव यांनी केली.
अधिक वाचा : अवैध धंदे चालवणाऱ्या कुख्यात गुंडाची गळा चिरून निर्घृण हत्या