नागपूर : कोव्हिडच्या संकटाने अनेकांचे हाल झाले आहेत. मात्र या संकटात नागरिकांच्या सेवेसाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेउन माणुसकीची प्रचिती दिली आहे. आता शिक्षण क्षेत्रातही नागपूरकर संस्थांनी सहकार्याचे मोठे पाउल उचलले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणा-या ६० विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेसह ‘जेईई’ आणि ‘नीट’चे नि:शुल्क धडे देण्यासाठी शहरातील दोन कोचिंग क्लासेस पुढे आले आहेत. महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारातून अग्रवाल स्टडी सेंटर आणि कॅलिबर्स नोव्हा या संस्थांनी या विद्यार्थ्यांच्या कोचिंगची जबाबदरी उचलली आहे.
समाजातील अनेक प्रतिभावंत विद्यार्थी योग्य संधी आणि मार्गदर्शनाअभावी मागे राहतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी अग्रवाल स्टडी सेंटर आणि कॅलिबर्स नोव्हा या कोचिंग क्लासेसद्वारे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मनपाच्या शाळांमध्ये शिकणारे अनेक प्रतिभावंत विद्यार्थी परिस्थितीअभावी पुढे जाउ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांमधील प्रतिभा हेरून त्यांना योग्य मार्गदर्शन देउन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये इतर विद्यार्थ्यांशी बरोबरीने शिक्षण घेण्याचे बळ दिले जाणार आहे.
यावर्षी दहावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांपैकी सर्वोत्तम ६० विद्यार्थ्यांची दोन्ही संस्थांद्वारे निवड केली जाणार आहे. यामधील विज्ञान शाखेतील ३० विद्यार्थ्यांना ‘जेईई’ आणि ‘नीट’चे तर ३० विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेचे धडे दिले जातील. यासाठी दोन्ही संस्था मनपाच्या प्रत्येकी १०० अशा एकूण २०० विद्यार्थ्यांची चाचणी घेणार आहेत. यामधून सर्वोत्तम ३०-३० असे एकूण ६० विद्यार्थ्यांची विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी निवड केली जाणार आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे अनेक प्रतिभावान विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या आवडीचे करिअर निवडण्याचा आणि त्यासाठी आवश्यक ते शिक्षण घेण्याचा इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच अधिकार आहे. मात्र त्यांच्या यशाच्या आड परिस्थिती येत असते. ही बाब लक्षात घेउन महापौर संदीप जोशी यांनी या विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला साकार करण्यासाठी शहरातील दोन कोचिंग संस्थांनी सहकार्य दर्शविले आहे. मनपाच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुढे आलेल्या अग्रवाल स्टडी सेंटर आणि कॅलिबर्स नोव्हा संस्थेच्या या पुढाकाराबद्दल महापौरांनी संस्थेचे पंकज अग्रवाल, जगदीश अग्रवाल, प्रिती अग्रवाल आणि राहुल राय यांचे आभार मानले आहे.