काही राज्यांमध्ये निवडणुकांची धामधूम सुरू आहे तर पुढील वर्षी लोकसभेच्या व महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. भाजपा व भाजपाचे विरोधक एकमेकांविरोधात प्रखर प्रचार करत असून भाजपानं ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून काँग्रेसविरोधात रान पेटवलं होतं, त्याच भ्रष्टाचाराच्या मुद्याला आता भाजपाविरोधकांनी कळीचा मुद्दा केला आहे.
चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी व त्यांच्या मीडिया मॅनेजर्सनी बदलता काळ ओळखत सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांचा निवडणुकांमध्ये प्रभावी वापर केला होता. आता भाजपाविरोधकांनीही वाढत्या डिजिटल क्षेत्राचं महत्त्व ओळखलं आहे. www.corruptmodi.com अशी एक वेबसाईटच चक्क सुरू करण्यात आली आहे.
या वेबसाईटचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ए ते झेड अशा कॅटेगरी असून त्या त्या अक्षराला क्लिक केल्यावर वेगवेगळ्या भ्रष्टाचारांच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या लिंक देण्यात आल्या आहेत. होमपेजवर घोटाळ्यांच्या ताज्या बातम्या आहेत आणि व्हिडीयो सेक्शनही देण्यात आला आहे. या साईटचं सध्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या फक्त लिंक देण्यात आल्या असून वेगळे लेख, आरोप अथवा विरोधी नेत्यांची भाषणं वगैरे काहीही दिलेले नाही. त्यामुळे केवळ मोदी सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या लिंक एकत्र देणारी न्यूज अॅग्रिगेटर साईट असं या वेबसाईटचं स्वरूप आहे.
तसेच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ही साईट भाजपा विरोधकांनी बनवली असल्याचं उघड असलं तरी या साईटच्या मागे कोण आहे हे अजिबात नमूद केलेले नाही. अबाउट अस म्हणजे, आमच्याबद्दल असं सांगणारा भागच या साईटवर नसल्यामुळे या साईटचे कर्ते अज्ञात आहेत. त्यामुळे काँग्रेस अथवा अन्य राजकीय पक्षाच्या सोशल टीमचं हे काम आहे का आणखी कुणाचं याचा थांगपत्ता लागत नाही. मात्र, नरेंद्र मोदींना मुख्यत: लक्ष्य केलेलं असल्यामुळे भाजपाच्या राजकीय विरोधकांचंच हे काम असावं असं मानण्यास जागा आहे.
अधिक वाचा : Farmers Protest in Delhi: २०१९ मध्ये देशाचा पंतप्रधान शेतकरी असेल: राजू शेट्टी