नागपूर : मराठा समाजाची दयनिय अवस्था आहे. राज्यशासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. अध्याप, ते दिले नाही. राज्यशासन मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे. नागपूर चे पालकमंत्री म्हणून तुम्ही योग्य भूमिका घेतली नाही, असे खडेबोल मराठा समाजातील महिलांनी नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावले.
गुरुवार क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक पुकारण्यात आली होती. उपराजधानी नागपूरातही मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. मराठा समाजाच्या तरुण- तरुणींनी या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करुन मोर्चा काढला.
मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारला असल्याची माहिती नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना असताना सुध्दा मराठ्यांचा गड असलेल्या नागपूरातील महाल परिसरातील मनपाच्या टाऊन हॉल येथे नागपूर जिल्हयातील विविध विषयावर सभा आयोजित केली होती. महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. आणि तेथून आंदोलकांनी थेट आपला मोर्चा महाल येथील मनपाच्या टाऊन हॉल कडे वळवला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा टाऊन हॉल येथे सुरु असतानाच आंदोलकांनी परिसर घोषनाने दणानून सोडला.
मुख्यमंत्री हाय हाय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण द्या अश्या घोषणा देऊन आपला रोष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर व्यक्त केला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन मंत्री बावनकुळे यांनी आंदोलकांना शांत करुन संबोधित केले. राज्यशासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्पर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी पुढाकार घेत आहेत, असे म्हणून मंत्री बावनकुळे यांनी आंदोलकांना निवेदनाची प्रत मागितली, तसेच तुमच्या मागण्या मुख्यमंत्री यांच्या कडे पोहचविणार असल्याची ग्वाही दिली.
पालकमंत्री बावनकुळे यांच्या या आश्वासनावर मराठा समाजातील तरुणी आक्रमक होऊन त्यांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्यावर प्रश्नाचा खडीमार केला. आंदोलकांची उग्रता लक्षात घेता मंत्री महोदय बावनकुळे यांनी काढता पाय घेतला.
अधिक वाचा : सकल मराठा समाजाच्या बंद ला नागपूर मधे उस्फूर्त प्रतिसाद