नागपूर : व्हरायटी चौकजवळील शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुलावरील मेट्रोच्या ‘स्टील गर्डर ब्रीज’चे कार्य अवघ्या सहा दिवसांत पूर्ण झाले आहे. ४४ मीटरचा हा ब्रीजचे काम पूर्ण झाले असून येत्या बुधवारपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी रविवारी दिली.
नागपूर मेट्रो रेल्वेच्या रिच-२ कॉरिडोरअंतर्गत व्हरायटी चौकाजवळ शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुलावर मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. जमिनीपासून १८.५ मीटर उंचीवर मेट्रोच्या दोन पिलरवर एकूण ४०० मीटर लांबीच्या स्पॅनसाठी झालेल्या या कार्यासाठी ४०० आणि २२० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन क्रेनचा वापर करण्यात आला. ‘स्टील गर्डर ब्रीज’चे कार्य होत असताना सतत जड लोखंडी साहित्याचा वापर होणार असल्याने वाहतुकीस धोका निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक विभागातर्फे कार्य पूर्ण होईपर्यंत आदिवासी गोवारी शहीद उड्डाणपूल बंद करण्यात आला होता. मात्र, आता स्टील गर्डर ब्रीज पुर्णत्वास आल्याने येत्या बुधवारपासून उड्डाणपूल पूर्ववत वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. इतके मोठे आणि जोखमीचे कार्य केवळ आठवड्याभराच्या आत करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मुंजे चौक ते झिरो माइल स्टेशन हे अंतर ६०० मीटर इतके आहे. झिरो माइल स्टेशनजवळ स्टील गर्डर ब्रीज तयार करण्यात आले आहे. यामुळे शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुलाच्या वरून मेट्रो धावणार आहे. या दोन्हींमधील अंतर तीन मीटर उंचइतके राहणार आहे. स्टील गर्डर ब्रीजचे अंतर ४४ मीटरइतके आहे. चोवीस तास काम करत आठवड्याभराच्या साकारण्यात आलेल्या ब्रीज पाच तुकड्यांमध्ये आहे.
अधिक वाचा : आयटीपार्क मार्गावरील ट्रंक लाईनचे काम १५ दिवसात पूर्ण करा : महापौर नंदा जिचकार