नागपूर: नागपुरात रविवारी २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या तयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी घेतला. त्यांनी फुटाळा तलावाच्या विसर्जन स्थळी आकस्मिक भेट देऊन तयारीची सद्यपरिस्थिती जाणून घेतली. फुटाळा तलाव येथे वायुसेना नगरच्या दिशेने ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे स्वयंसेवक पहिल्या दिवसांपासून सेवा देत आहेत. या स्वयंसेवकांची महापौरांनी भेट घेऊन माहिती जाणून घेतली. अगदी पहिल्या दिवसांपासून स्वयंसेवक भक्तांना कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनाची विनंती करीत आहे. निर्माल्य कुंडातच निर्माल्य दान करावे असा आग्रह करीत आहे. मनापाच्या आवाहनाला नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याची माहिती ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ चैटर्जी यांनी महापौर नंदा जिचकार यांना दिली. याप्रसंगी तलावावर मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या भक्तांना महापौर नंदा जिचकार यांनी स्वतः मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याची विनंती केली. महापौरांच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत निर्माल्य दान करीत कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन केले. यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी रामनगर आणि अंबाझरी येथील कृत्रिम तलावांना भेट देत मनपा तर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली.
सर्व गणेश भक्तानी जलप्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या चळवळीला सहकार्य करावे. कृत्रिम तलावातच मूर्ती विसर्जन करावे. निर्माल्य दान करावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले. विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी मनपाने जी व्यवस्था केली आहे त्याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.