नागपुर :- रूग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी, सर्व सुविधा मिळण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सक्षम असल्याचा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या एन.एच.यु.एम च्या साहय्याने सुरू असलेल्या सर्व दवाखान्यांना भेट दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त भूषण शिंगणे, कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेवक मनोज सांगोळे, दिनेश यादव, उपायुक्त जयंत दांडेगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिका टाटा ट्रस्टच्या साहाय्याने एनएचयुएमचे दवाखाने अद्ययावत करणार आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा आणण्याकरिता टाटा ट्रस्ट अर्थसाहाय्य करणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी महापौरांनी झिंगाबाई टाकळी, बेझनबाग, नंदनवन, कपिल नगर, शेंडे नगर येथील एनएचयूएमच्या दवाखान्यांना भेट दिली व तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
दवाखान्यातील स्टाफ रूम, डॉक्टर्स रूम, लेबॉरटरी, ओपीडी, औषधालयात जाऊन पाहणी केली. दवाखान्यात उपस्थित असलेल्या रूग्णांची आस्थेने चौकशी केली. सर्व दवाखान्यातील कामकाज बघून महापौर नंदा जिचकार यांनी समाधान व्यक्त केले.
नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णालयात पॅथॉलॉजी आणि बाळाचे लसीकरण उत्तमरीत्या सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
झिंगाबाई टाकळी येथील दवाखान्यात डॉक्टर्सची संख्या कमी आहे. त्या ठिकाणी रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर येते. त्या ठिकाणी डॉक्टर्सची संख्या वाढविण्याचे निर्देश महापौरांनी दिले. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
अधिक वाचा : रेल्वे स्टेशन वरील सफाई कर्मचाऱ्यांंचे “कामबंद आंदोलन”