नागपूर : महाराष्ट्र महापौर परिषदेच्या वतीने २७ ऑक्टोबर रोजी वसंतराव नाईक कृषी अनुसंधान केंद्र (वनामती) येथे राज्यस्तरीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषद आयोजनासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून राज्यभरातील महापौर सदर परिषदेत सहभागी होतील.
महापौर परिषदेचे उद्घाटन २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. यावेळी महापौर नंदा जिचकार, महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष प्रा. विश्वनाथ महाडेश्वर, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण प्रामुख्याने उपस्थित राहतील. महाराष्ट्र महापौर परिषदेच्या वतीने प्रा. विश्वनाथ महाडेश्वर आणि महापौर नंदा जिचकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करतील. याचवेळी लक्ष्मणराव लटके आणि रणजित चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘सारथी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करतील.
उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी १ वाजता महापौर परिषदेला सुरुवात होईल. राज्यभरातून आलेले महापौर संबंधित शहरांच्या विकासावर मंथन करतील. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होईल.
नागपुरातील पथदर्शी प्रकल्पांचे सादरीकरण
महापौर परिषदेत सहभागी होणाऱ्या राज्यभरातील महापौरांसमोर नागपुरात सुरू असलेल्या पथदर्शी प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येईल. नागपुरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यात येईल. परिषदेनंतर सायंकाळी सहभागी महापौरांची काही प्रकल्पांना भेट आयोजित करण्यात आली आहे.