नागपूर : प्रभागातील नागरिकांना मुलभूत गरजा मिळणे हा त्यांचा नैतिक अधिकार आहे. नागरिकांना पाणी, रस्ते, स्वच्छता या सर्व मुलभूत सुविधा देण्यास मनपा कटिबद्ध आहे. मी स्वतः त्याचा पाठपुरावा करून नागरिकांना सर्व सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करीन, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी दिला.
महापौरांनी नागपूर शहरातील नागरिकांच्या झोननिहाय समस्या जाणून घेण्यासाठी महापौर आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांनी लकडगंज झोनमधील प्रभाग क्रमांक ४ व २३ मधील नागरिकांशी भेट घेऊन तेथील समस्या जाणून घेतल्या.
यावेळी लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, रा.काँ गट नेते दुनेश्वर पेठे, नगरसेविका निरंजना पाटील, मनिषा अतकरे, मनिषा धावडे, नगरसेवक राजकुमार साहू, शेषराव गोतमारे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त विजय हुमने, सुभाष जयदेव प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी झोनमधील प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली.
झोन कार्यालयातील समाजकल्याण विभागात अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश सहायक आयुक्तांना दिले. याचवेळी त्यांनी मालमत्ता व पाणी कर वसुलीसंदर्भात संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून आढावा घेतला. करवसुलीचा वेग वाढवा आणि १०० टक्के उद्दिष्ट गाठा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्यानंतर त्यांनी कळमना येथील नवनिर्मित जलकुंभ परिसाराला भेट दिली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्याठिकाणी पाण्याचा समस्या मोठ्या प्रमाणावर होत्या. सहा महिन्याच्या आत पाण्याच्या सर्व समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
कचरा गाडी नियमित येत नाही, अशी तक्रार केली असता संबंधित स्वास्थ निरिक्षकाला महापौर नंदा जिचकार यांनी जाब विचारत कचऱ्यासंबंधी समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात, अन्यथा कडक कारवाई करू, असा इशारा महापौर नंदा जिचकार यांनी दिला.
अधिक वाचा : दोन वर्षांत महापालिका ४५० कोटींचे भूखंड मेट्रोला हस्तांतरित करणार