नागपूर : लक्ष्मीनगर झोन हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील भाग आहे. या भागातील नागरिकांच्या सुविधांसाठी सदैव पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. झोनमधील नागरिकांच्या सुविधेसाठी आवश्यक कामे करण्यासाठी निधीची कमतरता नाही. अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून ती कामे करून घ्यावी आणि नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्या, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मंगळवारी (ता. ५) महापौर नंदा जिचकार यांनी लक्ष्मीनगरमधील प्रभाग १६ व ३८ चा दौरा करून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, नगरसेवक लखन येरवार, किशोर वानखेडे, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे कर्मचारी व संबंधित विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी लक्ष्मी नगर झोनमधील प्रभाग १६ व ३८ अंतर्गत तकिया, इंडियन जिमखाना मैदान, काँग्रेस नगर उद्यान जवळील परिसर, खामला येथील संचयनी कॉम्प्लेक्स, हिंगणा मार्गावरील टाकळी सिम, यशोदा नगर, आनंद नगर आदी ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला.
प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी मनपाच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयातील विविध विभागांच्या कामाची माहिती जाणून घेतली. झोनमध्ये कोणत्याही समस्यांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये कामाप्रती शिस्त निर्माण होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्यांना प्रथम प्राधान्य देउन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने जबाबदारीने काम करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.
तकिया येथील इंडियन जिमखानाच्या मैदानात मुख्य मार्गालगत निर्माणधीन इमारत आहे. इमारतीबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्याने इमारतीचे बांधकाम अनेक वर्षापासून बंद आहे. मात्र अर्धवट बांधकामामुळे इमारतीच्या खालच्या भागात घाण पाणी जमा आहे. याशिवाय येथे कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे, डासांच्या प्रकोपाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याची तक्रार नागरिकांच्या वतीने यावेळी करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने इमारतीखालील खड्ड्यात जमा असलेले पाणी अत्यंत घातक आहे. खामला येथील संचयनी कॉम्प्लेक्स संदर्भातही अशीच परिस्थिती महापौरांना निदर्शनास आणून देण्यात आली. खामला मार्गालगत असलेल्या निर्माणाधीन बंद इमारतीचे प्रकरण न्यायालयात असल्याने अनेक वर्षांपासून इमारतीच्या तळभागात पाणी साचले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. याबाबत ठोस कारवाई करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी यावेळी केली. यासंदर्भातही योग्य निर्णय घेण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक बोलावून योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे महापौर नंदा जिचकार यांनी सांगतिले.
अधिक वाचा : धरमपेठ झोनमध्ये जनसंवाद : १५०च्या वर तक्रारींचा निपटारा