नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘व्हिजन’मुळे आज आपले नागपूर शहर स्मार्ट सिटीमध्ये अव्वल आहे. मात्र शहर स्मार्ट होत असताना शहरातील एक जबाबदार नागरिक म्हणून आपणही आपल्या वागणुकीतून स्मार्ट होणे आवश्यक आहे.
स्वच्छता, आरोग्य या सर्व बाबी नागरिकांच्याच हातात आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण शहरात स्वच्छतेसंदर्भात कारवाई सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून जागरूक होणे आवश्यक आहे. ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे लोकप्रतिनिधी व प्रशासनाशी नागरिकांचा थेट संपर्क येत आहे व ते आपल्या समस्या मांडू शकत आहेत. या उपक्रमाद्वारे नागरिक आपल्या समस्यांबाबत जागरूक झाले आहेत. नागरिकांच्या जागरूकतेविना स्वच्छ, सुंदर शहराची संकल्पनाच अपूर्ण आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मागील दोन महिन्यांपासून महापौर नंदा जिचकार यांनी दहाही झोनमध्ये दौरा करून नागरिकांशी त्यांच्या समस्यांबाबत संवाद साधला. त्याअंतर्गत नेहरू नगर झोनच्या प्रभाग २८ व ३० द्वारे बुधवारी (ता. १३) ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. याप्रसंगी नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेविका मंगला गवरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त हरीश राऊत यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महापौर नंदा जिचकार यांनी नेहरू नगर झोनमधील प्रभाग २८ व ३० अंतर्गत कामगार नगर रमना मारोती, श्यामबाग, सेवादल नगर, सक्करदरा तलाव, भोसले नगर, आशीर्वाद नगर, तोहिद नगर, रिंग रोड परिसर आदी भागांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.