नागपूर : शहरातील नागरिकांना भेडसावणा-या मुलभूत सुविधांबाबतच्या अडचणी सोडविणे हे नागपूर महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. यासाठी मनपाकडून विविध स्तरावरून प्रयत्नही सुरू आहेत. नागरिकांच्या समस्या लक्षात घेउन त्या तातडीने दूर करण्यासाठी ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे प्रभागात सुविधांसंदर्भात एकही काम बाकी राहणार नाही.
सर्व कामे तातडीने सोडविण्यासाठी मनपा तत्पर आहे. नागरिकांच्या पुढाकारानेच कोणत्याही प्रभागातील समस्या सुटण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या समस्यांबाबत जागरुक राहा, प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी मनपा सदैव तत्पर आहे, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी (ता. ६) लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग ३६ व ३७ चा दौरा करून येथील नागरिकांच्या समस्यांबाबत संवाद साधला. यावेळी लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती लहुकुमार बेहते, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका मिनाश्री तेलगोटे, पल्लवी श्यामकुळे, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्यासह ओसीडब्ल्यूचे कर्मचारी व संबंधित विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग ३६ व ३७ अंतर्गत द्रोणाचार्य नगर, बंडू सोनी लेआउट, त्रिमुर्ती नगर, आझाद हिंद नगर, प्रियदर्शनी कॉलनी, लोकसेवा नगर, गावंडे नगर आदी ठिकाणी भेट देउन महापौर नंदा जिचकार यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
द्रोणाचार्य नगर येथे नाल्याच्या बाजूला असलेल्या मटन मार्केटमुळे रस्त्यावर नेहमी गर्दी असते. नाल्यालगत ही दुकाने थाटल्याने नाल्याची भिंतही पडली आहे. शिवाय बाजुलाच असलेल्या वाईन शॉपमुळे नाल्याच्या बाजूलाच अनेक लोक दारू पितात त्यामुळे परिसरात दिवस-रात्र असामाजिक तत्वांचा वावर असतो. नाल्याच्या बाजूला अतिक्रमण करून थाटण्यात आलेल्या मटन मार्केटमुळे विविध प्रकारे त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली. नागरिकांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी लवकरच महापौर कक्षात मटन मार्केट व्यावसायिकांची बैठक बोलाविण्याचे निर्देश यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
बंडू सोनी लेआउट परिसरात आयटीपार्क मार्गालगत ट्रंक लाईनच्या कामासाठी खड्डे खणण्यात आले आहेत. मात्र या खड्ड्यांच्या सभोवताल कोणत्याही प्रकारचे बॅरिकेडस् लावण्यात आले नाही. अनेक महिन्यांपासून काम बंदावस्थेत असल्याने परिसरात नेहमी दुर्घटनेचा धोका असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. तातडीने काम करून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी संबंधित कामाचे कंत्राटदार व अभियंता दोघांचीही महापौर कक्षात बैठक बोलाविण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.
त्रिमुर्ती नगर येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राला यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी भेट दिली. विरंगुळा केंद्रामध्ये महिलांसाठी प्रसाधनगृह तयार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. फुलोरा फाउंडेशनतर्फे शहरात विविध भागात प्रसाधनगृह तयार करण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत त्रिमुर्ती नगर येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रामध्येही प्रसाधगृह तयार करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
आझाद हिंद नगर परिसरातील नाल्याच्या भितींवर अतिक्रमण करून नागरिकांनी घराचे बांधकाम केले व घरातील सांडपाणी या नाल्यात सोडण्यात येते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. नाल्यावर अतिक्रण करून नाल्यात सांडपाणी सोडणा-या सर्व नागरिकांना अतिक्रमण हटवून सांडपाण्याचे नाल्यात वळविलेले पाईप हटविण्याबाबत नोटीस बजाविण्याचे निर्देश यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिले. परिसरातच नाल्याची भिंत तुटली असून नाल्यात अस्वच्छता असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात नगरसेवकांसोबत बैठक बोलावून याबाबत कार्यवाही करण्याचेही महापौरांनी निर्देशित केले. याशिवाय नाल्यालगत कचरा फेक-यांवर दंडात्मक कारवाई करणे तसेच परिसरात कचरा टाकणा-यांवर दंडात्मक कारवाईचे फलक लावण्याचेही त्यांनी निर्देश दिले. नाल्यावर असलेले छोटे पूल तुटले असून नवीन मोठे पूल बांधण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.
प्रियर्शनी कॉलनी परिसरात नागरिकांना होणा-या गडर लाईनच्या त्रासामुळे येथे नवीन लाईन टाकण्यात आली. या लाईनला नागरिकांनी आपापल्या घरातील जोडणी करण्याचे आवाहन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले. लोकसेवा नगर येथे विद्युत दिव्यांची व्यवस्था नसल्याने परिसरात चोरी होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. या ठिकाणी तात्काळ विद्युत खांब लावून विद्युत दिवे लावण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. जवळील मुख्य मार्गालगत पथदिवे लावले आहेत. मात्र झाड्यांच्या फांद्यांनी हे पथदिवे झाकले गेले आहेत. पथदिव्याला विळखा दिलेल्या फांद्या त्वरीत हटविण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.
गावंडे नगर येथे सुरू असलेले रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. येत्या सोमवारपर्यंत तातडीने या मार्गाचे काम सुरू करून ते लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले. याच रस्त्याच्या बाजूला अनेक वर्षांपासून बंदावस्थेतील वाहने ठेवण्यात आली आहेत. ही वाहने हटविण्याबाबतही तात्काळ कार्यवाही करण्याचे महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.
अधिक वाचा : लक्ष्मी नगर झोनमध्ये ‘महापौर आपल्या दारी’