नागपूर : नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या लवकरात लवकर दूर करण्याच्या दृष्टीने महापौर आपल्या दारी उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने त्वरीत कार्यवाही करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत गुरूवारी (ता. १७) महापौर नंदा जिचकार यांनी हनुमान नगर झोनचा दौरा करून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी हनुमान नगर झोन सभापती रुपाली ठाकूर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, नगरसेवक सतीश होले, डॉ. रवींद्र भोयर, भगवान मेंढे, नगरसेविका स्वाती आखतकर, विद्या मडावी, लीला हाथीबेड, उषा पॅलेट, शीतल कामडी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त विजय हुमने, हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे कर्मचारी व संबंधित विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महापौर नंदा जिचकार यांनी गुरूवारी (ता. १७) हनुमान नगर झोनमधील प्रभाग २९ व ३१ अंतर्गत म्हाळगी नगर, न्यू म्हाळगी नगर, नरसाळा, गायत्री नगर झोपडपट्टी, रेशीमबाग, बुधवार बाजार, सोमवारी क्वॉर्टर आदी ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला.
प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी मनपाच्या हनुमान नगर झोन कार्यालयातील विविध विभागांच्या कामाची पाहणी केली. म्हाळगी नगर येथील पाण्याच्या टाकीजवळील मार्गाची दुरवस्था झाली असल्याने या ठिकाणी रस्ता बांधकाम करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. यासंबंधी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून याबाबत कार्यवाही करण्याचे महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले. झोनमधील विविध भागांमध्ये टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जाते. मात्र टाकीवर पाणी भरताना बरेच पाणी वाया जात असल्याचे यावेळी निदर्शनास आले. पाणी व्यर्थ जाऊ नये यासाठी योग्य अंमलबजावणी करण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.
न्यू
म्हाळगी नगर येथील शिवाजी कॉलनीमध्ये महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात नेहमी असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्याबाबतच्या कार्यवाहीचा यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी आढावा घेतला. येथील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेऊन येत्या २२जानेवारीला कारवाई करण्याचे त्यांनी निर्देशित केले. अतिक्रमित जागेवर नागरिकांसाठी ‘वॉकिंग ट्रॅक’, ग्रीन जिम व सुरक्षा भिंत तयार करण्याची मागणी यावेळी परिसरातील नागरिकांनी केली. यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. याच परिसरात असलेल्या विहिरीमध्ये कचरा टाकण्यात येत असल्याने विहिरीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या विहिरीला रंग देऊन येथील पाणी उद्यानांसाठी वापरणे तसेच विहिरीमध्ये कचरा टाकला जाऊ नये यासाठी जाळी बसविण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.
नरसाळा मार्गावर एलईडी विद्युत दिवे लावण्याची मागणी यावेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. मे महिन्यापर्यंत संपूर्ण शहरामध्ये एलईडी विद्युत दिवे लावण्याचे लक्ष्य असून त्या अंतर्गत लवकरच एलईडी दिवे लावण्यात येणार असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले. जगनाडे चौकातील गायत्री नगर झोपडपट्टी तसेच रेशीमबाग येथेही महापौरांनी दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. बुधवार बाजार येथे पाण्याच्या टाकीजवळच कनक रिसोर्सेसचे डम्पिंग यार्ड असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. डम्पिंग यार्डसाठी पर्यायी जागा निर्धारित करून त्या ठिकाणी डम्पिंग यार्ड हलविणे तसेच सेफ्टी टँकरवर प्रसाधनगृहाचे बांधकाम असल्याने या ठिकाणी गडर लाईन टाकण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले. सोमवारी क्वॉर्टर येथील मनपा शाळेच्या इमारतीचा योग्य वापर करून सुसज्ज अशी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका व मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आले आहे. या अभ्यासिकेच्या निर्मितीबद्दल महापौरांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
अधिक वाचा : ‘मेयर इनोव्हेशन काउंसिल’च्या कार्यालयाचे उद्घाटन