शिवाजी नगर उद्यानात निर्माण कार्याचे भूमिपूजन
नागपुर :- दिव्यांगांच्या उत्थानासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. सामान्यांप्रमाणेच दिव्यांगांचेही जीवन सुकर व्हावे, त्यांनाही विविध क्षेत्रात सन्मान मिळावा, यासाठी शासन विविध उपक्रम राबविते. केंद्र व राज्य शासनाच्या उपक्रमातूनच उभारण्यात येणारे शहरातील पहिली सुलभ संचार व्यवस्था हा स्तुत्य उपक्रम असून हे केंद्र दिव्यांगांसाठी प्रेरणास्त्रोत ठरावे, असा आशावाद महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
केंद्र व राज्य शासनाच्या ‘सुगम्य भारत’ उपक्रमांतर्गत शहरातील शिवाजी नगर उद्यानात सुलभ संचार व्यवस्थेचे महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महापौर बोलत होत्या. याप्रसंगी स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, नगरसेविका रूपा रॉय, उद्यान निरीक्षक अमोल चौरपगार, वास्तुविशारद त्रिलोक ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर श्रीमती जिचकार म्हणाल्या, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये दिव्यांग व्यक्तिंनी आपल्या कार्यकर्तृत्त्वाचा ठसा उमटविला आहे. मागील तीन ते चार वर्षापासून केंद्र व राज्य शासनाकडूनही मोठा दिलासा मिळत आहे. दिव्यांगांसाठी ‘सुलभ संचार’ अशी व्यवस्था निर्माण करणे हा प्रेरणादायी उपक्रम आहे. शहरात उभारण्यात येणारे पहिलेच केंद्र शहराची वेगळी ओळखही दर्शविणार आहे, असेही त्या म्हणाल्या. शहरात सगळीकडे वेगाने विकासकामे होत आहेत. त्यामुळे सुलभ संचार केंद्राचेही कामाला गती मिळावी व ते लवकर पूर्णत्त्वास यावे. सुलभ संचार केंद्राच्या कामात कोणत्याही त्रुट्या राहु नयेत याकडे विशेष द्या, असे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.
शिवाजी नगर उद्यानातील १५ हजार चौरस फूट जागेमध्ये साकारण्यात येणाऱ्या सुलभ संचार केंद्रात दिव्यांगांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. विविध खेळांचे साहित्य व व्यवस्था केली जाईल. अंधांसाठी ब्रेल लिपीमध्ये विविध माहितीचे फलक लावण्यात येणार आहे, अशी माहिती स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले यांनी दिली. उद्यान निरीक्षक अमोल चौरपगार यांनी आभार मानले.
हेही वाचा : कोराडी तालाब की सफाई के लिए 90 टन का महाकाय जहाज तालाब में उतारा गया