नागपूर : आईवडिलांकडून पैसे आणण्यासाठी सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वाडी पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. विशाखा सचिन मोरे (२६) (रा. डिफेन्स वसाहत, वाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
विशाखाचे सचिन मोरेसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस सुखात गेल्यानंतर पती सचिन, सासरे कृष्णराव मोरे आणि सासू शीलाबाई मोरे यांनी तिला तिच्या आईवडिलांकडून पैसे आणण्यास सांगितले. त्याचप्रमाणे दीर राहुल मोरे यास नोकरीवर लावण्यासाठी तुझ्या माहेरहून पैसे आण असे म्हटले होते. विशाखाने त्यांची मागणी फेटाळून लावल्याने सासरच्या मंडळीनी तिचा छळ सुरू केला होता. शेवटी या छळाला कंटाळून २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास विशाखाने गळफास लावला.
सासरच्या लोकांना ही माहिती समजताच त्यांनी तिला डिफेन्स हॉस्पिटल येथे नेले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी विशाखाचे वडील दिलीप ठाकरे (६०) रा. राधेश्वरनगर, दिघोरी यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा : नागपूरात एरोनॉटिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या