मुझफ्फरनगर: उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका ३७ वर्षीय व्यक्तीनं त्याच्या पत्नीची गोळी झाडून हत्या केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पत्नीनं शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानं नाराज झालेल्या पतीनं पत्नीचा खून केला. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीनं स्वत:च्या ३ मुलांना कालव्यात फेकलं. मुझफ्फरनगरमधील बसेडी गावात ही घटना घडली. या मुलांचा शोध अद्याप लागलेला नाही.
पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ‘पत्नी १५ दिवसांपासून शरीरसंबंधास नकार देत होती. सकाळी तिनं न ऐकल्यास तिची हत्या करायची असा निश्चय आदल्या रात्रीच केला होता आणि तेच झालं. सकाळी पत्नीनं जवळ येण्यास नकार दिला. त्यामुळे तिची गोळी झाडून हत्या केली,’ अशी माहिती पतीनं चौकशीदरम्यान पोलिसांना दिली.
पत्नीची हत्या केल्यानंतर पती मुलांना घेऊन कालव्याजवळ पोहोचला. पत्नीनंतर मुलांचं पालनपोषण कोण करणार, या विचारानं त्यानं मुलांना कालव्यात फेकून दिलं. सानिया, वंश आणि हर्षिता अशी या मुलांची नावं आहेत. यापैकी हर्षिता केवळ १५ महिन्यांची आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. त्याचं नाव पप्पू असं आहे. कालव्यात फेकण्यात आलेल्या मुलांचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप एकही मूल हाती लागलेलं नाही. पोलिसांनी पप्पूला तुरुंगात पाठवलं असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.