नागपूर : एका युवकाने १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची राजस्थानमध्ये दीड लाख रुपयांत विक्री केली. विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याने त्या मुलीला मजूर म्हणून शेतीच्या कामावर ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी त्या मुलीच्या प्रियकर आणि दोन दलालांना हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली.
गुन्हे शाखा पोलिसांनी नवरदेवासह आंतरराज्यीय टोळीच्या तीन सदस्यांना पकडले आहे. पंकज हनुमान आपतुरकर (३०, रा. भवानीनगर पारडी), श्यामलाल रामकिसन गुजर (३३) आणि सुरेंद्र जगन्नाथ चौधरी (२७, झालावाड, कोटा-राजस्थान) अशी आरोपीची नावे आहेत.
पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अजनी येथील रामटेकेनगरात राहते. तिच्या कुटुंबात आई आणि भाऊ आहे. आर्थिक परिस्थितीमुळे हलाखीची होती. दरम्यान, तिचे पंकज आपतुरकर या ऑटोचालक युवकाशी सूत जुळले. त्याने तिच्या गरिबीचा फायदा घेत तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. डिसेंबर २०१६ मध्ये पंकजने तिच्या माध्यमातून पैसे कमविण्याची युक्ती लढवली. त्याने प्रेयसीला दलालाच्या माध्यमातून देहव्यापारासाठी विकण्याचे ठरविले. पंकजने पीडित अल्पवयीन मुलीची मानसिक अवस्था ओळखली. लग्नाचे आमिष दाखवून तिला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. तो तिला एका महिला दलालाकडे घेऊन गेला. दोघांनी मध्य प्रदेशातील एका दलालाशी संपर्क केला. त्यांनी दीड लाख रुपयांत दलालाला मुलीची विक्री केली. दलालाने तिची जास्त किंमत ठरविण्यासाठी राजस्थानला नेले. तेथे मुलीला श्यामलाल गुजर नावाच्या व्यापाऱ्याला विकले. श्यामलालने तिला काही महिने घरी ठेवून अत्याचार केला. नंतर तिला सुरेंद्र चौधरी नावाच्या व्यक्तीला दोन लाख रुपयांत विकले. सुरेंद्रने बनावट दस्तावेजाच्या मदतीने तिच्याशी लग्न केले आणि तिला आपल्या शेतावर बंधुआ मजूर म्हणून ठेवले.
काही दिवसांतच मुलीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरेंद्रचे कुटुंबीय तिच्यावर पाळत ठेवायचे. काही दिवसांपूर्वी तिने गावातील शाळेच्या शिक्षकाला आपली हकीकत सांगितली. त्याने मोबाईल देऊन आईशी बोलणे करून दिले. तेव्हा तिने आपल्या आईला फोन करून आपबीती सांगितली. आईने नितीन मोंढे नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने हुडकेश्वर पोलिस स्टेशन गाठले.
अधिक वाचा : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून