नागपूर: शहरात कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील अनेक क्षेत्र प्रतिबंधीत करण्यात आले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये मनपातर्फे आवश्यक सर्व सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. या भागात पाणी पुरवठ्याकडेही प्राधान्याने लक्ष देण्यात यावे. यासह संपूर्ण शहरातही पाणी पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनातील संबंधित अधिका-यांनी गांभीर्याने लक्ष देत प्रतिबंधित क्षेत्रासह संपूर्ण शहरात पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा, असे निर्देश उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिले.
शहरातील पाणी पुरवठ्यासंदर्भात व्यवस्थेसंबंधी चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता.२०) उपमहापौर मनीषा कोठे यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे संजय रॉय, के.एम.पी.सिंग, राजेश कालरा आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपमहापौर मनीषा कोठे यांनी झोननिहाय पाणी समस्येचा आढावा घेतला. अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी यांनी शहरातील पाणी पुरवठ्याच्या स्थितीची माहिती दिली. शहरातील काही भागांमध्ये २४x७ योजना यशस्वी आहे. तर काही भागात प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले. झोपडपट्टी भागामध्ये दुषीत पाणी पुरवठा तसेच अत्यंत कमी वेळ पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारी तातडीने सोडविण्याचे निर्देश उपमहापौरांनी यावेळी दिले.
शहरात कोरोनाचे संकट उभे आहे. प्रशासनातर्फे नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला नागरिकही प्रतिसाद देत आहे. त्यामुळे या लोकांना उत्तम सुविधा पुरविणे मनपाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी कार्य करा, असेही त्यांनी निर्देशित केले. याशिवाय अनेक भागामध्ये नळ कनेक्शन नसल्याने त्या भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो. कोरोनामुळे अनेक भागामध्ये टँकर न आल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून प्राप्त झाल्याचे बैठकीमध्ये मान्यवरांनी सांगितले. नागरिकांच्या सुविधेच्यादृष्टीने प्रशासनाने गांभीर्य जपण्याची गरज आहे. पुढे उन्हाची दाहकता वाढणार आहे. त्यामुळे येत्या काळात टँकरने सुद्धा गरज असलेल्या ठिकाणी सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, असेही निर्देश उपमहपौर मनीषा कोठे यांनी दिले.
ओसीडब्ल्यूतर्फे शहरात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आज शहरात उद्भवलेल्या स्थितीवर मात करण्यासाठी ओसीडब्ल्यूला सर्व पदाधिकारी व मनपा प्रशासनाद्वारे योग्य सहकार्य मिळत आहे. पदाधिकारी आणि प्रशासनाच्या सहकार्याने पुढेही नागरिकांना उत्तम सेवा पुरविण्यास तत्पर असल्याचे ओसीडब्ल्यूच्या पदाधिका-यांद्वारे यावेळी सांगण्यात आले.
Also Read- महिन्द्रा ॲन्ड महिन्द्रा कंपनीच्या वतीने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी “फेस शिल्ड” सुपुर्द