महामेट्रो नागपुरातील बाजार विकसित करणार, महामेट्रो व महापालिका यांच्यात सामंजस्य करार

Date:

नागपूर : शहरातील चार प्रमुख बाजार विकसित करण्यासाठी महापालिका आणि महामेट्रो यांच्यात सोमवारी सामंजस्य करार झाला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महालातील नगरभवनमध्ये विविध प्रकल्पाच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या करारानुसार महापालिकेच्या जमिनीवर महामेट्रो कॉटन मार्केट, संत्रा मार्केट, नेताजी मार्केट आणि गोल मार्केट विकसित करणार आहे. यासाठी महापालिका ही सर्व जमीन महामेट्रोला भाडेपट्टीवर (लिज) तीस वर्षांकरिता देईल. या चारही ठिकाणी बहुमजली इमारती उभारण्यात येतील. येथील दुकानाचे गाळे विकण्यात येतील. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात महापालिका आणि महामेट्रोचा प्रत्येक ५० टक्के वाटा राहणार आहे.

मेट्रो उभारणीच्या खर्चात महापालिकेला पाच टक्के वाटा उचलायचा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने जमिनी देऊन मेट्रोकडून विकसित केल्या जात आहेत.

दरम्यान, गडकरी यांनी विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. पारडी उड्डाण पुलासाठी २५ जानेवारीपासून जमिनी खरेदी कराव्या, अशोक चौक ते इंदोरा चौक उड्डाण पूल उभारण्याचा विचार सुरू आहे. त्याचे आराखडे (डिझाईन ) तयार करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय केळीबाग रोड, जुना भंडारा रोड, गड्डीगोदाम ते टेकानाका, वैष्णोदेवी ते पारडी चौकपर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

महालमधील बुधवार बाजार विकसित करताना येथील दुकाने तीस वर्षांसाठी भाडेतत्त्वावर (लिज) देण्यात येईल. त्यासाठी आगाऊ रक्कम (अ‍ॅडवान्स पेमेंट) घेण्यात येणार आहे. सक्करदरा बुधवार बाजाराचे डिझाईन आर्किटेक्ट मोखा यांच्याकडून तयार करण्यात येणार आहे.

यशवंत स्टेडियम पाडून येथे एम्पीथिटर विकसित केले जाणार आहे. यासाठी महापालिका, नासुप्र, टिकळ पत्रकार भवन, जिल्हा ग्रंथालय, झोपु यांची संयुक्त बैठक लवकरच बोलण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील फाईल मुंबई मंत्रालयात सादर करण्यात आली आहे.केंद्रीय रस्ते निधीमधून शहरात रस्ते आणि भुयारी रेल्वेमार्ग विकसित केले जाणार आहेत. यापैकी ११ प्रकल्पांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. सात रेल्वे भुयारी मार्गाना रेल्वेची परवानगी हवी आहे, तर दोन प्रकल्पाची निविदा तातडीने काढण्याची सूचना गडकरी यांनी दिल्या. सीआरएफमधून या सर्व प्रकल्पांना १८८२ कोटी दिले जाणार आहेत, असे माजी महापौर प्रवीण दटके यांनी सांगितले.

आरबीआय भुयारी मार्ग रद्द

आरबीआय ते गड्डीगोदामपर्यंत भुयारी मार्ग बांधण्याची योजना होती, परंतु ती खर्चिक असल्याने त्याऐवजी सिमेंट रस्ता तयार केला जाणार आहे, असेही दटके म्हणाले.

रेल्वे स्थानक उड्डाण पूल

रेल्वे स्थानकासमोरील उड्डाण पूल पाडून सहापदरी सिमेंट रोड तयार करण्याचे डिझाईन अंतिम टप्प्यात आहे. विद्यमान पूल तोडण्याचे काम महामेट्रोला देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता तयार करणार आहे. या उड्डाणपुलाखाली १७५ दुकाने आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मॉल उभारण्यात येत आहे. यासाठी रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या एसटीचे विभागीय कार्यालय आणि मध्यप्रदेश बसस्थानक, संरक्षण खात्याची दीड एकर जमीन तसेच मॉडेल स्कूलची जमीन संपादित केली जाणार आहे. या जमिनीऐवजी संरक्षण खात्याला अहमदनगरला जमीन दिली जाणार आहे.

अधिक वाचा : लेझीम पथकाद्वारे नागपूर मेट्रो कोचेसचे भव्य स्वागत : मेट्रो कोचेस नागपूरात दाखल

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related