नागपूर : महामेट्रो नागपूरच्या माध्यमातून देशात पहिल्यांदाच एका अॅपच्या माध्यमातून नागरिकांना मल्टी मॉडेल इंटिग्रेशन किंवा फिडर सर्व्हिसेस चा लाभ घेता येणार आहे.
महामेट्रोच्या पुढाकाराने सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी संस्थांशी चर्चा करून ही संकल्पना प्रत्यक्षात कशी राबविता येईल, यावर विचारमंथन करण्यात येत आहे. राष्ट्रीय नागरी वाहतूक धोरणाप्रमाणे (एनयूटीपी) नागपूर शहरासाठी सर्व मेट्रो स्टेशनवरून सुविधाजनक वाहतूक व्यवस्था प्रदान करणे व पर्यावरण संवर्धन करण्याच्या दिशेने महामेट्रो कार्य करीत आहे.
महामेट्रोच्या या प्रयत्नामुळे नागरिकांना केवळ एका अॅपच्या माध्यमातून मेट्रोसह सायकल, ई-रिक्षा, ई-स्कूटर, आॅटो-रिक्षा, टॅक्सी, बस व इतर सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविणाºया वाहनातून प्रवास करता येणार आहे. या अॅपच्या माध्यमाने शहरातील वाहतुकीच्या विविध घटकासंबंधी महत्त्वाची माहिती सहज मिळू शकेल. तसेच यात वाहतुकीच्या या साधनांचा मार्ग, वेळापत्रक आणि नेमका प्रवास दर काय ही माहिती मिळू शकेल. जीपीएस प्रणालीच्या मदतीने जवळील वाहनांची माहिती मिळेल. कॉमन मोबिलिटी कार्डच्या साहाय्याने प्रवास भाडे चुकवणे देखील शक्य होईल.