नागपूर : रोजगारासाठी नागपुरात आलेले १ हजार ३७० परप्रांतीय कामगार लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. काम बंद असल्याने बेरोजगार आहेत. त्यांचे येथे स्वत:चे घर नसल्याने अडचणीत सापडलेल्या या लोकांना महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रात आश्रय देण्यात आला आहे. यात सर्वाधिक ६८८ लोक मध्य प्रदेशातील आहेत.
महापालिकेची पाच स्थायी व १५ अस्थायी निवारा केंद्रे आहेत. या केंद्रात विविध राज्यांतील निराश्रित आश्रयास आहेत. यात मध्य प्रदेशातील सर्वाधिक ६८८ असून सर्वांत कमी कर्नाटकातील एक व्यक्ती आहे. महापालिकेने सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने या लोकांची जेवणाची व निवासाची व्यवस्था केली आहे. लॉकडाऊन असेपर्यंत या सर्वांनी निवारा केंद्रातच राहावे, असे आवाहन मनपाने केले आहे.
निवारा केंद्रांतील बहुसंख्य लोक येथे रोजगारासाठी आलेले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बंद झाला आहे. ते गावाला जाण्याच्या तयारीत होते. परंतु त्यांना जाता आले नाही. मनपा व पोलिस प्रशासनाने या लोकांची निवारा केंद्रात राहण्याची व्यवस्था केली आहे. कोरोना संसर्गापासून बचावासाठी त्यांना मास्क व साधने उपलब्ध करण्यात आलेली आहेत.
Also Read- सामाजिक अंतर पाळा, कोरोनाची साखळी खंडीत करा!