नागपूर : धावत्या रेल्वेत शस्त्राच्या धाकावर लुटमार करणाèया टोळीला लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीतील सातही सदस्य नागपुरातील रहिवासी असून त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त केला आहे. अनेक आरोपींनी यापूर्वी घरफोड्या केल्या आहेत. हत्येचाही आरोपी आहे. यात एक अल्पवयीन आहे.
विशाखापट्टणमवरून नवी दिल्लीकडे निघालेली ०२८८७ समता एक्स्प्रेस २८ ऑक्टोबरच्या रात्री नागपूर स्थानकानजीक आउटरवर असताना अचानक याटोळीतील काही युवक गाडीत शिरलेत. काही कळण्यापूर्वी शस्त्राच्या धाकावर त्यांनी लुटमार सुरू केली, इंजिनपासून दुसèया बोगीतील नीलेश गुप्ता, सुनील गुप्ता (रा. उत्तरप्रदेश) यांना चाकूच्या धाकावर लुटले. नीलेशची पर्स आणि १ हजार ८०० रुपये तसेच सुनीलचे अडीच हजार रुपये, त्याचप्रमाणे भोपाळला जाणारा मनीष पटले आणि जितेश पटलेवरही घाव घालून लुटपाट केली. नंतर धावत्या गाडीतून उड्या टाकून ते अंधाराचा फायदा घेत पसार झालेत. या झटापटीत एक प्रवासी जखमी झाला. या प्रकरणी भयभीत झालेल्या प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली होती.
लोहमार्ग पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच लोहमार्ग पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधार्थ गठीत केले. गुप्त माहितीच्या आधारे नरेश उर्फ लखन भंडारकर (२०) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांसह धावत्या गाडीत दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यामुळे मो. अतिक मो. रफिक वय २०, मोमीनपुरा, शाहरुख हनिफ हकीम खान (२०), कमलेश उर्फ जंगली शिंदेकर (२३), सक्षम उर्फ बोनड्या मौंदेकर (१८), रजत देवघरे (२३) या सहा जाणांसह एका अल्पवयीन आरोपीला अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र तसेच मोबाइल व अन्य असा २७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यातील अनेक आरोपींनी यापूर्वी घरफोड्या केल्या आहेत. हत्येचाही आरोपी आहे.
ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात लोहमार्ग गुन्हे शाखेचे प्रभारी सपोनि कविकांत चौधरी, सपोनि सचिन म्हेत्रे, पोलिस हवालदार दीपक डोर्लीकर, रवींद्र सावजी, चंद्रशेखर येळेकर, पोलिस नायक श्रीकांत धोटे, विनोद खोब्रागडे, अविन गजवे, अमित त्रिवेदी, गिरीश राऊत, विजय मसराम, संदीप लहासे, नलिनी भानारकर, मंगेश तितरमारे यांनी केली.