पांढरकवडा येथील नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी सुरू असलेल्या नवनवीन प्रयोगांबाबत भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील राज्याच्या वनखात्यावर सडकून टीका होत आहे. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्सच्या नागरिकांनी समाजमाध्यमांवरुन एकूणच या कार्यपद्धतीवर टीका केली आहे तर कॅनडातील भारतीयांनी तेथील शॉपिंग मॉलमध्ये निदर्शने केली. आता भारतासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही ‘लेट अवनी लिव्ह’ या नावाने त्या वाघिणीच्या बचावासाठी मोहीम सुरू झाली आहे.
पांढरकवडय़ातील टी-१ (अवनी) वाघिणीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यासाठी २२ सप्टेंबरपासून राज्याच्या वनखात्याने तब्बल २०० लोकांना घेऊन मोहीम सुरू केली आहे. मात्र, महिना होत आला तरी वनखात्याला अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे आता वनखात्याच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जात आहेत. टी-१ वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आधी हत्ती, नंतर घोडे, इटालियन श्वान, पॅरामोटर्स आणि आता डुकरांचा वापर करण्यात येत आहे. मात्र, कुत्रे आणि डुकराच्या वापर चुकीचा असल्याची टीका केली जात आहे. डुकरांमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकारी व्यक्त करत आहेत.
तब्बल २३ दिवसांपासून वाघिणीच्या संदर्भात सुरू असलेल्या या वैध-अवैध प्रयोगांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. इंग्लंडमधील डॅन रिचर्डसन यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे, मौल्यवान वाघीण आणि तिच्या बछडे धोकादायक स्थितीत असून त्यांना वाचवा म्हणून आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी सह्यंची मोहीम देखील राबवली.
अधिक वाचा : नरभक्षक वाघिणी च्या शोधासाठी हत्ती, इटालियीन कुत्र्यानंतर आता पॅरा ग्लायडर