कोराडी मंदिर आज भाविकांसाठी खुले

कोराडी मंदिर आज भाविकांसाठी खुले

नागपूर : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर आज सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर सर्वांसाठ़ी खुले होताच आई जगदंबेच्या दर्शनासाठ़ी असंख्य भाविकांनी गर्दी केली होती. प्रत्येकाला आई जगदंबेच्या मुखकमलाकडे पाहण्याची प्रचंड उत्सुकता दिसत होती. अतिशय प्रसन्न आणि सुंदर असे आईचे मुखकमल प्रत्येक दर्शनार्थीचे आकर्षण होते.

संपूर्ण चांदीने मढवलेल्या गाभार्‍यात आई जगदंबेची मूर्ती अधिक तेजस्वी दिसत होती. नवरात्राच्या दहा दिवसात हे तेज अधिक वाढत जाणार आहे. गाभाऱ्याचे अनेक दिवसानंतर भाविकांना दर्शन मिळाले. जगदंबेच्या मंदिर परिसरात सुरू असलेल्या सुमारे २५० कोटींच्या विकास कामांमुळे आणि गाभारा मढविण्याच्या कामासाठी सुमारे ४ महिने जगदंबेचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. तब्बल चार महिन्यांनंतर आज प्रथमच ते भाविकांसाठ़ी खुले करण्यात आले. त्यामुळे भाविकांमधील प्रचंड उत्साह आणि दर्शनासाठी लागलेली ओढ दिसत होती.

आज सकाळी मंत्रोच्चाराने देवीची पूजा करण्यात आली. सायंकाळी देवीसमोर होमहवन करण्यात आले. त्यानंतर महाआरती झाली. या महाआरतीत असंख्य भाविक महिला-पुरुष सहभागी झाले होते. मंदिराचे विश्वस्त आणि मार्गदर्शक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आणि मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश शर्मा यांच्या हस्ते गोंधळाच्या गजरात महाआरती करण्यात आली. गोंधळाच्या गजराने हा परिसर दुमदुमला होता. भाविकांच्या अंगात एक उत्साह संचारला असल्याचे जाणवत होते. महाआरतीच्या वेळी प्रसिध्द उद्योजक रमेश मंत्री, संस्थानचे सर्व विश्वस्त, सचिव फुलझेले व अनेक मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा : बिरसा क्रान्ति दल ने “रावण महागोगो” का आयोजन कर रावण की महापूजा की