नागपूर- आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण किती आहे हे माहीत करून घ्यायचे असेल तर १५ आॅगस्टपासून नागपूर येथील रमण विज्ञान केंद्र येथे येऊन जाणून घ्या. पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी फक्त तीनच टक्के शुद्ध पाणी पिण्यासाठी कसे काय उरलेय याची माहितीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध असेल. नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रात पाण्याची उत्पत्ती, उपयोग, पाणी प्रदूषण, पाण्यामुळे होणारे रोग, दिवसेंदिवस कमी कमी होत जाणारे जमिनीतील पाणी…याविषयी सविस्तर माहिती देणारे एक प्रदर्शन कायमस्वरूपी साकारले आहे. येत्या १४ आॅगस्ट रोजी या प्रदर्शनीचे उदघाटन होत आहे. केंद्र संचालक एन. रामदास अय्यर यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, चौथे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल, असे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे. कारण बेसुमार पाणी उपशामुळे जमिनीतील पाण्याचा साठा कमी होत आहे. तरीही लोक पाणी जपून वापरत नाहीत. या प्रदर्शनीतून पाण्याविषयी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे. पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागते. चाॅकलेट तयार करण्यासाठी चक्क २४ हजार लिटर पाणी लागते. १ किलो मांसासाठी ४,८०० लिटर, पानकोबीसाठी २०० लिटर, १ किलो शेंगदाणा पिकवण्यासाठी ८,७१३ लिटर, तर एका संत्र्यासाठी ५२ लिटर पाणी लागते, अशा भन्नाट माहिती येथे उपलब्ध आहे.
आपण वाया घालवतो हजारो लिटर पाणी
टाॅयलेटमध्ये फ्लश केल्यानंतर २४ लिटर पाणी लागते, तर १० मिनिटे शाॅवर सुरू ठेवल्यास १५२ लिटर पाणी लागते…एक सफरचंद तयार होण्यासाठी ७२ लिटर पाणी लागते. आपण खातो ती फळे, भाजीपाला, द्रव पदार्थ, अगदी प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागते, अशी मनोरंजनासोबत शिक्षण देणारी माहिती ३० प्रतिकृतींच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
पाण्याविषयी माहीत करून घ्या खूप काही…
भूजलात फ्लोराइडची समस्या भेडसावत आहे. नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय शेतीला दिल्या जाणाऱ्या खतांच्या मात्रांमध्ये असलेले नायट्रेट भूजलात मिसळते. जांभा खडकामुळे भूजलात लोह वाढले आहे, तर काही ठिकाणी क्षारांचे प्रमाण वाढते आहे. क्षारयुक्त पाणी माणसांचे व प्राण्यांचे आयुष्यमानही कमी करते. या भूजलाचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.
अधिक वाचा : नागपुर को दूर रखा गया है ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाआे’ योजना से