कार्तिक ‘दोस्ताना २’ नंतर आणखी एका चित्रपटातून बाहेर.

कार्तिक

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन चाहत्यांचा लाडका आहे. त्याने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावलं आहे. परंतु, करण जोहर आणि कार्तिक यांच्यामधील वादामुळे ‘दोस्ताना २’ मधून कार्तिकला बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला. ‘दोस्ताना २’ नंतर आणखी एक चित्रपट कार्तिकच्या हातून निसटला आहे. काही काळापूर्वी कार्तिकने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याने या चित्रपटाची तयारी देखील सुरू केली होती. परंतु, आता कार्तिकने या चित्रपटातून माघार घेतली आहे.

लोकप्रिय दिग्दर्शक वसन बाला या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट एका कॉमिकच्या सुपरहिरोवर आधारित आहे. चित्रपटाचं नाव ‘फँटम’ असून हा एक सायन्स फिक्शन असलेला चित्रपट असणार आहे. या चित्रपटासाठी कार्तिकची निवड करण्यात आली होती. परंतु, आता मात्र कार्तिकने चित्रपटातून माघार घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या प्रकारचा चित्रपट बाला यांना बनवायचा होता ती पद्धत कार्तिकला पटत नव्हती. चित्रपटाबद्दल कार्तिकची मतं काही निराळी होती. हा कार्तिकचा पहिला सुपरहिरो असलेला चित्रपट असणार होता त्यामुळे कार्तिकच्या नुसार हा चित्रपट बिग बजेट असायला हवा होता. परंतु, बाला यांचं म्हणणं वेगळं होतं.

क्रिएटिव्ह इशुमुळे कार्तिकने या चित्रपटाला नकार दिला आहे. आता तो या प्रोडक्शनसोबत दुसरा चित्रपट साइन करणार आहे. कार्तिकने या चित्रपटाबद्दलची घोषणा केल्यावर त्याचे चाहते प्रचंड आनंदित झाले होते. परंतु, याबातमीसोबतच त्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. कार्तिक लवकरच त्याच्या ‘धमाका’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. कार्तिकच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये भरपूर उत्सुकता आहे.