कामठी, रामटेक, उमरेडमध्ये आजपासून आरक्षणाची सुविधा

पहिल्या टप्प्यात ९ आरक्षण कार्यालये सुरू केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आज २६ मेपासून १४ रेल्वेस्थानकांवरील आरक्षण कार्यालये सुरू करण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे.

Reservation kamthi

नागपूर : पहिल्या टप्प्यात ९ आरक्षण कार्यालये सुरू केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आज २६ मेपासून १४ रेल्वेस्थानकांवरील आरक्षण कार्यालये सुरू करण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आदेशानुसार रेल्वेस्थानक तसेच रेल्वेच्या परिसरातील आरक्षित तिकीट काऊंटर सुरू करण्यासाठी कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून विभागातील इतवारी, भंडारा रोड, गोंदिया, नैनपूर, बालाघाट, राजनांदगाव, डोंगरगड, नागभिड, छिंदवाडा रेल्वेस्थानकावरील आरक्षण कार्यालय २२ मेपासून सुरू करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर रोड, आमगाव, तिरोडा, सिवनी, मंडला फोर्ट, ग्वारीघाट, कामठी, रामटेक, वडसा, सावनेर, सौंसर, चांदाफोर्ट, तिरोडी, उमरेड येथील आरक्षण कार्यालय आज २६ मेपासून सुरू करण्यात येणार आहेत. या सर्व आरक्षण केंद्रावर प्रत्येकी एक काऊंटर आरक्षणासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान सुरू राहणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी प्रवाशांना शारीरिक अंतर ठेवून आरक्षण कार्यालयात गर्दी करू नये तसेच मास्क वापरण्याची व गरज असली तरच प्रवास करण्याची सूचना केली आहे.

Also Read- राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्टद्वारे पोलिसांना आवश्यक किटचे वाटप