ब्रॉडगेज रेल्‍वे प्रकल्‍पामूळे कळमेश्‍वर ते अजनी रेल्‍वे स्‍टेशन अंतर 15 मिनिटात कापणे शक्‍य

NITIN GADKARI

नागपूर: प्रस्‍तावित ब्रॉडग्रेज रेल्‍वे प्रकल्‍पामूळे कळमेश्‍वर ते अजनी रेल्‍वे स्‍टेशन हे अंतर 15 मिनिटात कापणे शक्‍य होणार आहे. यासाठी लागणा-या मेट्रो कोचेस्‌चा कारखाना वर्धा जिल्‍हयातील सिंदी येथे सुरू करण्‍यात येईल. या प्रकल्‍पामूळे कामठी प्रमाणेच कळमेश्‍वर  नागपूर शहराचा भाग बनेल, असे प्रतिपादन केंद्रीय नितीन गडकरी यांनी आज कळमेश्‍वर येथे केले. केंद्रीय रस्‍ते वाहतूक महामार्ग मंत्रालया अंतर्गत सावनेर – धापेवाडा – कळमेश्‍वर –गोंडखैरी या राज्‍य महामार्ग 547 ईचे चौपदरीकरण, कळमेश्‍वर – तोंडाखैरी – सिल्लोरी मार्गाचे रूंदीकरण, दहेगांव रेल्‍वे क्रॉसिंग मटन मार्केट (कळमेश्‍वर) – ब्राम्‍हणी जिनींग – घोराड या मार्गाचे चौपदरीकरण, साहूली – सेलू – गुमथळा – उप्‍परवाही- घोगली – घोराड – धापेवाडा मार्गाचे रूंदीकरण या राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्‍या भूमीपूजन समारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कळमेश्‍वर नगर परिषदेच्‍या जलतरण तलाव व बग़ीचा सौंदर्यीकरण कामाचे तसेच नगरपरिषद विद्यालयाच्‍या नवीन इमारतीचे लोकार्पणही त्‍यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

सावनेर – धापेवाडा – कळमेश्‍वर – गोंडखैरी या महामार्गाच्या सुमारे 725 कोटी रूपयाच्‍या तरतुदीने केल्‍या जाणा-या चौपदरीकरणामुळे धापेवाडा येथील  प्रतिपंढरपूर – विठ्ठल मंदीर तसेच अदासा येथील गणेश मंदीर या तीर्थस्‍थळांच्‍या विकासाला चालना मिळेल. कळमेश्‍वर – ब्राम्‍हणी साठी राज्‍य शासनाकडून पाणी पुरवठा योजनेसाठी 60 कोटी रू. ची तरतूद करण्‍यात येईल, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. कळमेश्‍वर नगर परिषदेतर्फे निर्मित जलतरण तलाव व शाळा या संरचनेच्‍या दृष्‍टीने उत्‍तम आहेत. हा तालुका  प्‍लास्टिक-मुक्‍त व स्‍वच्‍छ करण्‍यासाठी नगर परिषदेच्‍या पदाधिका-यांनी अ‍धिक प्रयत्नशील रहावे, असे  आवाहन त्‍यांनी यावेळी केले.

विविध विकास कार्याच्‍या भूमीपूजन व लोकार्पणाद्वारे सुमारे 820 कोटी रूपये कळमेश्‍वर – ब्राम्‍हणी तालुक्‍याला मिळाले आहेत, असे यावेळी  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निदर्शनास आणून दिले.

याप्रसंगी कळमेश्‍वर – ब्राम्‍हणी नगर  परिषदेच्या नगराध्‍यक्षा स्मृती ईखार , न.प. सदस्‍य, नागरिक, राष्‍ट्रीय म‍हामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

उमरेड व सावनेर येथे विविध विकासकार्यांचे भूमीपूजन व लोकार्पण

यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग  मंत्रालया अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे आशिर्वाद मंगल कार्यालय, उमरेड येथे आयोजित नागपूर-उमरेड राष्ट्रीय महामार्ग, उमरेड-मालेवाडा महामार्गाचे दुपदरीकरण आणि केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत अंभोरा येथे वैनगंगा नदीवर पुलाच्या बांधकाम आदी विकासकामांच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगीही नितीन गडकरी उपस्थित होते.

सावनेर येथे राष्ट्रीय महामार्ग 47 वरील बोरुजवाडा उड्डाणपुलाचे  व सावनेर बायपास चे लोकार्पण  गडकरी यांच्या हस्ते आज झाले.बोरुजवाडा उड्डाणपूलाची  लांबी 1 कि.मी. असून यासाठी 38 कोटी रुपये खर्च आला आहे.  राष्ट्रीय महामार्ग 547 वरील    सावनेर बायपासची लांबी 4.7 कि.मी. असून यावर 82.80 कोटी खर्च आला आहे.