जम्मू काश्मीर: मधील कुलगाम येथे मंगळवारी दोन दहशतवाद्यांनी सैन्यापुढं शरणागती पत्करल्याची घटना घडली आहे. दोन्ही दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असल्याची माहिती समोर येत आहे. सैन्य आणि दहशतवाद्यांची चकमक सुरु असतानाच या दोन्ही दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलवण्यात आलं. इथं दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांना विनवणी केल्यानंतर त्यांनी सैन्यापुढं शरणागती पत्करत शस्त्र टाकली.
हे दहशतवादी स्थानिकच असून, सैन्यापुढं त्यांनी अशी शरणागती पत्करणं यात सैन्याचं यश समजलं जात आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार शरण आलेल्या दहशतवाद्यांकडून दोन पिस्तुल आणि काही स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.
जम्मू काश्मीरमधील 280 जिल्हा विकास परिषद अर्थात डीडीसीच्या जागांवर 8 सत्रांमध्ये झालेल्या निवडणुकांसाठी आज मतमोजणी होणार आहे. राज्यातील सर्व 20 जिल्ह्यांत सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. ही निवडणूक 8 सत्रांमध्ये झाली होती. अनुच्छेद 370 हटवल्यानंतर आणि जम्मू काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतरची ही पहिली निवडणूक ठरत आहे.
‘टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी’द्वारे यशस्वी यकृतदान, पित्याने एक वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवले
निवडणुकांच्या या रणधुमाळीदरम्यान येथे घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर स्थानिक पोलीस यंत्रणा आणि सैन्याची करडी नजर होती. यातच सैन्यापुढं दहशतवाद्यांचं शरण येणं हे देशाच्या आणि सैन्याचाही दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं ठरत आहे.
गेल्या काही दिवसांत या भागात काय घडलं?
जम्मू काश्मीरमधील सीमा भागात दहशतवाद्यांच्या घुसखोरीला प्रत्येक वेळी हाणून पाडण्यात सैन्याला आजवर यश मिळालं आहे. त्यातच शेजारी राष्ट्र पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाचंही सैन्य तोडीस तोड उत्तर देतं. असं असलं तरीही, दहशतवादी कारवाया सुरुच आहेत. गुरुवारीच इथं सैन्यासोबतच्या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली. तर 14 डिसेंबरला सैन्याला इथं मोठं यश मिळालं. इथं एका दहशतवाद्याला जीवंत पकडलं गेलं तर, दोन दहशतवाद्यांना सैन्यानं कंठस्नान घातलं. हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानमधील असल्याचं सांगण्यात येत असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.