वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) जागतिक स्तरावरचे शिक्षण देण्यासाठी भारतामध्ये पाच राष्ट्रीय डिझाइन संस्था (एनआयडी) स्थापन केल्या आहेत. एनआयडी अहमदाबाद (अहमदाबाद-गांधीनगर आणि बेंगळुरू विभाग) या संस्थांचे कामकाज 1961 पासून सुरू आहे. त्यानंतर आणखी चार म्हणजेच एनआयडी आंध्र प्रदेश, एनआयडी हरियाणा, एनआयडी आसाम, एनआयडी मध्य प्रदेश यांचे कार्य गेल्या काही वर्षांपासून सुरू झाले आहे. या पाचही एनआयडी संस्थांना संसदेच्या अधिनियमांनुसार राष्ट्रीय महत्वाच्या संस्था म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच या संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा विचारात घेवून अतिशय उच्च प्रतीचे शिक्षण देण्यात येते. एनआयडीमधून पदवी घेतलेले अनेक विद्यार्थी भारतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. या संस्थेचे अनेक विद्यार्थी बाहेरच्या देशांमध्येही अतिशय आव्हानात्मक क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत.
जर्मनीने परदेशातल्या विद्यार्थ्यांसाठी एक मध्यवर्ती कार्यालय (झेडएबी) सुरू केले आहे. या कार्यालयामार्फत जर्मनीमध्ये कार्य करण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांच्या पात्रतेचे मूल्यामापन करण्यात येते. या कार्यालयामध्ये ‘अॅनाबिन डाटाबेस’ तयार करण्यात येतो. झेडएबी कार्यालयाने जमा केलेली माहिती जर्मनीमध्ये अधिकृत मानण्यात येते. जर्मनीमध्ये पदविका आणि पदवी यांच्या समकक्ष परदेशातली कोणती पदवी आणि उच्च शिक्षण योग्य आहे, त्यांची सूची या कार्यालयाच्या वतीने करण्यात येते.
परदेशातल्या विद्यापीठ स्नातकांना जर जर्मनीमध्ये कार्य परवाना हवा असेल, तसेच नोकरी करण्यासाठी असलेला व्हिजा अथवा ‘जर्मन ब्ल्यू कार्ड’ घ्यायचे असेल तर काही अटी आणि नियम आहेत. जर्मनीबाहेरच्या कोणत्या विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे आहे, जे शिक्षण तुम्ही घेतले आहे, ते जर्मनमधल्या विद्यापीठांच्या समकक्ष आहे का, हे पाहिले जाते. तसेच जर्मनमध्ये तीन ते चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच पदवी मिळते. त्याप्रमाणे बाहेरच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले आहे की नाही, हे जर्मनीमध्ये कार्य परवाना देताना प्रामुख्याने पाहिले जाते.
एनआयडी अहमदाबाद या संस्थेचा 2015 मध्ये जर्मनच्या ‘अॅनाबिन’ सूचीमध्ये समावेश करण्यात आला होता. आता यंदा उर्वरित चारही भारतीय एनआयडी संस्थांचा समावेश ‘अॅनाबिन’च्या माहितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
अॅनाबिन सूचीमध्ये सर्व एनआयडींचा समावेश करण्यात आल्यामुळे या संस्थेच्या विद्यार्थी वर्गाला जर्मनीमध्ये कार्य परवाना मिळणे आता अधिक सुकर होणार आहे. त्यांना जर्मनीमध्ये आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अर्ज करता येणार आहे.