देशात 5G तंत्रज्ञानचा (5G Technology) आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याबाबत जी चिंता व्यक्त केली जात आहे, ती पूर्णपणे चुकीची असल्याचं सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (COAI) म्हटलं आहे. आतापर्यंत जे काही पुरावे उपलब्ध आहेत, त्यानुसार असं दर्शवलं जातं, की पुढच्या पिढीसाठी हे तंत्रज्ञान पूर्णपणे सुरक्षित आहे, असंही ते म्हणाले. 5G तंत्रज्ञान पूर्णपणे फासे पलटवणारं ठरेल आणि यामुळे अर्थव्यवस्था आणि समाजाला जबरदस्त फायदा होईल, यावार COAI ने जोर दिला आहे.
रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यासारख्या मोठ्या कंपन्यांचं COAI प्रतिनिधित्व करते. भारतात दूरसंचार क्षेत्रात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मर्यादेसंदर्भात आधीच कडक नियम आहेत. जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त मानदंडांपेक्षा भारतातील नियम कठोर आहेत, असं सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सांगितलं.
COAI चे महासंचालक एस पी कोचर यांनी सांगितलं, की जागतिक स्तरावर स्वीकारल्या जाणाऱ्या मानकांच्या तुलनेत केवळ 10 टक्के रेडिएशन भारतात परवानगी आहे. रेडिएशनबद्दल जी काही चिंता व्यक्त केली जात आहे ती योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे भ्रामक असून ज्यावेळी असं एखादं नवं तंत्रज्ञान येतं तेव्हा असंच होतं, असंही ते म्हणाले.
देशात येणाऱ्या 5G वायरलेस नेटवर्कला आव्हान देणारी अभिनेत्री जूही चावलाची याचिका दिल्ली हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळून लावत तिला 20 लाख रुपये दंड ठोठावला. या निर्णयाचं स्वागत करत, कोचर यांनी 5G बाबत पसरणाऱ्या अफवांना आळा घालण्यात मदत होईल असंही ते म्हणले. उद्योग मंडळानेही अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर जोरदार टीका केली होती, असंही त्यांनी सांगितलं.