आयपीएलच्या 23 व्या (IPL 2021) सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने दमदार विजय मिळवला. हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. गायकवाडने 75 तर फॅफने 56 धावांची खेळी केली. या खेळीसह फॅफने (Orange Cap) ऑरेंज कॅप पटकावली आहे.
गब्बरला पछाडत मिळवली कॅप
फॅफने या सामन्यात शानदार अर्धशतक लगावलं. यासह फॅफने दिल्लीचा सलामीवीर ‘गब्बर’ शिखर धवनला पछाडत ऑरेंज कॅप पटकावली आहे. या सामन्याआधी ही कॅप धवनकडे होती. मात्र फॅफने या खेळीसह ऑरेंज कॅप मिळवली. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप देण्यात येते.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीतले टॉप 5 बॅट्समन
फॅफ डु प्लेसीस, चेन्नई सुपर किंग्स : 6 मॅच, 270 धावा
शिखर धवन, दिल्ली कॅपिटल्स : 6 मॅच, 265 धावा
के एल राहुल, पंजाब किंग्स : 6 मॅच, 240 धावा
ग्लेन मॅक्सवेल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 6 मॅच, 223 रन्स
जॉनी बेयरस्टो, सनरायजर्स हैदराबाद, 6 मॅच, 218 धावा
ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिसची शानदार भागीदारी
विजयी धावांचे पाठलाग करताना चेन्नईची धमाकेदार सुरुवात झाली. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस या सलामी जोडीने चेन्नईला दमदार सुरुवात मिळवून दिली. यो दोघांनी 129 धावांची भागीदारी केली. ऋतुराजने 75 तसेच फॅफने 56 धावांची खेळी केली.
चेन्नईचा विजयी पंच
चेन्नईने हैदराबादवर मात केली. यासह चेन्नईने या मोसमातील सलग 5 वा विजय साकारला. चेन्नईची या मोसमाची सुरुवात पराभवाने झाली. मात्र त्यानंतरच्या सर्व सामन्यात चेन्नईने विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. या विजयासह चेन्नईने पॉइंट्स टेबलमध्ये बंगळुरुला पछाडत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.