नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत समग्र शिक्षा अभियान-समावेशित शिक्षण व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. ३) जागतिक दिव्यांग दिनानिमित्त स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. यानिमित्त फुटाळा तलाव परिसरामध्ये शंभरावर दिव्यांग व सामान्य विद्यार्थी, पालक तसेच मनपाच्या समग्र शिक्षा अभियान कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांनी स्वच्छतेचा संदेश देत परिसराची स्वच्छता केली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशात मोठया प्रमाणात स्वच्छतेची चळवळ राबविण्यात येते. आजपर्यंत विविध माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पोहचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये क्रमवाढीसाठी नागपूर महानगरपालिकेनेही जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. मनपाच्या या मोहिमेला साथ देत समग्र शिक्षा अभियान-समावेशित शिक्षणतर्फे पुढाकार घेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त स्वच्छता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमांतर्गत फुटाळा परिसरात स्वच्छता अभियानासह परिसरात दिव्यांग विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत ओला व सुका कचरा वेगवेगळा कचरापेटीत टाकण्याचेही आवाहन केले. या स्वच्छता अभियानामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली. विद्यार्थी, पालक व अभियानात सर्वांना सुरक्षेच्यादृष्टीने साहित्य देण्यात आले. स्वच्छता अभियानात सहभागी दिव्यांग विद्यार्थ्याने संत गाडगे महाराज यांची वेषभूषा करून उपस्थित नागरिकांना आपले घर, परिसर व शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.
मनपाच्या समग्र शिक्षा अभियान-समावेशित शिक्षणचे प्रभारी अभिजीत राउत, संजय काकडे यांच्यासह एका पायाने दिव्यांग असूनही इच्छाशक्तीच्या बळावर एव्हरेस्टचे ८५०० मीटर अंतर सर करणारे अशोक मुन्ने यांनीही अभियानाला पाठींबा दर्शवित स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसह मनपा शाळेतील विद्यार्थी, पालक, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
अधिक वाचा : मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे यश