नागपूर: मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीयस्तराचे कन्व्हेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. स्वीडन व आखाती देशांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनुकूलता दर्शवली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मिहान येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरच्या नियोजित जागेवर विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पहिल्या फूड शोच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, केंद्रीय सहसचिव व्ही. राधा, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, व्हीआयए अन्नप्रक्रिया फोरमचे अध्यक्ष अरुण खोब्रागडे, डॉ. सुहास बुधे, किरण पातूरकर आणि मराठवाडा इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मिहानमधील आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटरचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आलेला आहे. लवकरच तो मार्गी लावण्यात येईल. तसेच अन्नप्रक्रिया उद्योगातील उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. राज्यात या उद्योगांच्या विकासासोबत मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जात आहे. स्वीडन आणि आखाती देशांनी महाराष्ट्रासोबत फूड फॉर ऑइल आणि ऑइल फॉर फूड यासंदर्भात पंतप्रधानांसोबत करार केला आहे. त्यानुसार, या क्षेत्रातील नामांकित उद्योजकांनी राज्याला भेट दिली आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला अनुकूलता दर्शविली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषीमाल खरेदीसाठी थेट करार करणार आहे. यातून राज्यात तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जागा हवी आहे. शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी आणि उद्योजकांमध्ये विदेशी कंपन्यांसोबत थेट पुरवठा साखळी तयार करू शकणार आहे. अन्नप्रकिया उद्योगनिर्मिती प्रकियेच्या पॉलिसीमध्ये मराठवाडा आणि विदर्भाला झुकते माप देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विदर्भ, मराठवाड्यातील औद्योगिक विकासासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या आंतरविभागीय समितीने मागासलेल्या जिल्ह्यानिहाय अभ्यास करून अहवाल तयार केला. तो मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. यात 16 सेक्टरमध्ये जिल्हानिहाय औद्योगिक असमतोलाबद्दल सूचना केलेल्या आहेत. आभार सुहास बुधे यांनी मानले.
अधिक वाचा : महामेट्रो नागपुरातील बाजार विकसित करणार, महामेट्रो व महापालिका यांच्यात सामंजस्य करार