नवी दिल्ली: नागपूर जिल्ह्यातील कामठीमधील सुप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस येथे ‘आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट शांती परिषद’ दिनांक 17 व 18 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची, माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे यांनी दिली.
श्रीमती कुंभारे यांनी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या शांती परिषदेस केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय पर्यटन मंत्री (स्वतंत्र प्रभार) के.जे.अल्फॉन्स उपस्थित राहणार असल्याची माहिती सुश्री कुंभारे यांनी दिली.
धम्मचक्र परिवर्तन सोहळयाचा कार्यक्रम नागपूर मधील दीक्षाभूमी येथे दरवर्षी आयोजित केला जातो. या कार्यक्रमास बौद्ध धर्माचे जगभरातील अनुयायी मोठ्या संख्येने येतात. यावेळी नागपूर परिसरातील बौद्ध स्थळांनाही हे अनुयायी भेटी देतात. ड्रॅगन पॅलेस येथेही लाखो अनुयायी दरवर्षी येतात. याचे औचित्य साधून या आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट शांती परिषदेचे आयोजन केले असल्याचे श्रीमती कुंभारे यांनी सांगितले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेस चीन, जपान, म्यानमार, श्रीलंका, थायलंड या देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. देशातील बौद्ध स्थळांच्या पायाभूत सुविधा, येथील दळणवळणाची साधने, पाली भाषेतील बौद्ध साहित्य आदी विषयांवर परिषदेत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती श्रीमती कुंभारे यांनी दिली.
अधिक वाचा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त कारागृहातून बंद्यांची मुक्तता