इन्स्टाग्राम बंद करणार ‘हे’ लोकप्रिय फीचर

Instagram

न्यूयॉर्क : फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप किंवा इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सतत नवे फीचर्स आणले जात असतात तसेच काही जुनी फीचर्स हटवलीही जात असतात. आता ‘इन्स्टाग्राम’ आपले एक लोकप्रिय फीचर हटवणार आहे.

जे लोक इन्स्टाग्रामचा वापर करतात त्यांना त्यामधील ‘स्वाईप अप’ फीचरची माहिती असेलच. हे फीचर इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये पाहायला मिळते. स्वाईप अप करून तुम्ही स्टोरीमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊ शकता. आता 30 ऑगस्टपासून हे फीचर इन्स्टाग्रामवर दिसणार नाही.

या फीचरचा वापर कॉन्टेंट क्रिएटर्स आणि कंपन्या करतात. या लिंकचा वापर करून यूजर सामान खरेदी करू शकतात. तसेच आर्टिकलही वाचू शकतात. एका रिपोर्टनुसार आता हे फीचर इन्स्टाग्रामवर दिसणार नाही. आता यूजर्सना या फीचरच्या जागी लिंक स्टोरीज स्टीकरचा वापर करावा लागेल.

अ‍ॅप रिसर्चर जेन मान्चुआन वोंग याने इन्स्टाग्रामच्या या नवीन फीचरचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. लिंक स्टीकर्स नावाचे हे फीचर स्वाईप अप लिंक्सप्रमाणेच काम करील. मात्र, त्याचे प्रेझेंटेशन थोडे वेगळे असेल. रिपोर्टनुसार कंपनी या फीचरचे टेस्टिंग जूनपासून करीत आहे. सध्या काही यूजर्सना हे फीचर टेस्टिंग स्वरूपात मिळत आहे. ऑगस्टअखेर हळूहळू सर्व यूजर्सना हे फीचर मिळेल. स्वाईप अप फीचर बंद होईपर्यंत नवीन फीचर सर्वांसाठी जारी केले जाईल.

मात्र, हे नवीन फीचर सर्व यूजर्सना मिळणार नाही. ज्यांचे अधिक फॉलोअर्स आहेत व अकाऊंट व्हेरिफाईड आहे अशा यूजर्सनाच हे फीचर मिळेल. लिंक स्टिकर्सचा लाभ म्हणजे क्रिएटर्स येथे वेगवेगळी स्टाईल निवडू शकतील. वेगळी स्टाईल निवडून लिंकचा समावेश करू शकतात जे स्टिकर्ससारखे दिसेल.