नागपूर : केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या खासगीकरणासाठी पहिले पाऊल उचलले आहे. अर्थसंकल्पात यासंबंधीचे स्पष्ट संकेत केंद्र सरकारने नुकतेच दिले होते. दिल्लीहून लखनऊला जाणारी ‘तेजस एक्स्प्रेस’ ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार आहे. या रेल्वेसंबंधीच्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय १० जुलैपर्यंत होणार असल्याची माहिती ‘आयआरसीटीसी’ने दिली आहे.
रेल्वेने १०० दिवसांच्या अजेंडाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या काळात देशात दोन खासगी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. रेल्वेचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकार आक्रमक झाले असले तरी या निर्णयाला आम्ही विरोध करू, असे ‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे मेन’ (NFIR) ने म्हटले आहे. तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार असून ती ताशी २०० किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे आहे. तेजस एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्यासाठी ३ कोटी २५ लाख रुपये खर्च आला आहे. तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली ट्रेन आहे की ज्या ट्रेनला स्वयंचलित प्लगसारखे दरवाजे लावण्यात आले आहेत. म्हणजेच मेट्रोसारखे या ट्रेनचे दरवाजे आपोआप उघडतील व बंद होतील.
या रेल्वेला खास सजवण्यात आले आहे. तेजस नाव असल्याने रेल्वेच्या डब्याला सूर्यकिरणाचा रंग देण्यात आला आहे. ही एक्स्प्रेस चालवण्याची घोषणा २०१६ मध्ये करण्यात आली होती. दिल्ली-लखनऊ मार्गावर सध्या ५३ रेल्वे चालवण्यात येतात. या मार्गावरील सर्वात प्रीमियम रेल्वे ही सुवर्ण शताब्दी आहे.
अधिक वाचा : विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास