राजकोट: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉच्या पाठोपाठ विराटनंही शतक झळकावलं आहे. विराट कोहलीचं हे २४ वं कसोटी शतक असून फक्त ७२ कसोटी सामन्यांमध्ये २४ शतकं पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
विराटनं जगातील इतर कोणत्याही खेळाडूपेक्षाकमी कसोटी सामने खेळून २४ शतकांचा टप्पा गाठला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपलनं ८७ सामन्यांमध्ये तर, पाकिस्तानच्या जावेद मियाँदादनं १२४ सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला होता. या सगळ्यांना मागे टाकत विराटनं ७२ सामन्यांमध्येच ही कामगिरी केली आहे. याचबरोबर भारतीय मैदानांवर विराटनं ३ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. याआधी इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत दहा डावांमध्ये ५९३ धावा करत विराट टॉप स्कोरर ठरला होता.
विराटनं घरगुती मैदानावर ५३ सामन्यांमध्ये ३ हजार धावा केल्या आहेत. याआधी ब्रायन लारा आणि चेतेश्वर पुजारा यांनीही ५३ सामन्यांमध्येच ३ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. डॉन ब्रॅडमनने सर्वात कमी ३७ सामन्यांमध्ये घरगुती मैदानांवर ३ हजार धावांचा टप्पा गाठला होता.
अधिक वाचा : वन डे रँकिंगमध्ये विराट पहिल्या, तर रोहित दुस-या क्रमांकावर