नवी दिल्ली: गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारताने घेतलेल्या कणखर पवित्र्यापुढे अखेर चीनने नमते घेण्याची तयारी दर्शविली आहे. चीनच्या मोल्डो येथे नुकती दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. तब्बल १० तास झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी पूर्व लडाखमधू आपले सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे. ही चर्चा सकारात्मक झाली असून आगामी काळात दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासंदर्भातही एकमत झाल्याचे समजते.
१५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांना भिडले होते. यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर भारताच्या प्रत्युत्तरात ४५ चिनी जवान मारले गेल्याचे सांगितले जाते. मात्र, चीनने अद्याप या वृत्ताला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. या संघर्षानंतर भारताने चीनविरोधात कठोर भूमिका घेतली होती.
या पार्श्वभूमीवर मोल्डो येथे कोर कमांडर स्तरावर बैठक पार पडली. या बैठकीत भारताने गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच पँगाँग लेकच्या परिसरातूनही चिनी सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी केली.
गलवान खोऱ्यातील हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी पूर्व लडाखमध्ये मोठ्याप्रमाणावर सैन्य तैनात केले होते. केंद्र सरकारनेही लष्कराला वेळ पडल्यास बंदुकीचा वापर करण्याची मुभा दिली होती. याशिवाय, भारतीय रणगाडे आणि लढाऊ विमाने या भागात तैनात करण्यात आली होती.
मात्र, चीनचा कावेबाज स्वभाव बघता भारतीय सैन्याकडून सावधगिरीने पावले उचलण्यात येतील. यापूर्वी ६ जूनला दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेवेळी गलवान खोऱ्यातून सैन्य मागे घेण्याविषयी एकमत झाले होते. मात्र, १५ जूनच्या रात्री भारतीय लष्कराची तुकडी या भागाची पाहणी करायला गेली असताना चीनच्या सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख मनोज नरवणे लडाखच्या दिशेने रवाना झाले आहेत. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस ते लडाखमध्ये असतील. या दौऱ्याच्यावेळी ते गलवान खोऱ्यामध्ये जाऊन तिथल्या कमांडर्सकडून परिस्थिती जाणून घेतील, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली.
Also Read- अखेर दहावी- बारावीच्या निकालाची तारीख ठरली