Ind vs Eng: विराट कोहली फिट झाला नाही तर अश्विनकडे कर्णधारपद दिलं जाऊ शकतं
लंडन : इंग्लंड विरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत २-०नं पिछाडीवर पडला आहे. १८ ऑगस्टपासून तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. या टेस्ट मॅचसाठी जसप्रीत बुमराह, आर. अश्विन आणि हार्दिक पांड्या फिट घोषित करण्यात आले आहेत. दुसऱ्या टेस्टदरम्यान बॅटिंग करताना हार्दिक आणि अश्विनच्या बोटाला दुखापत झाली होती. तर बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे बुमराह इंग्लंडविरुद्धची टी-२०, वनडे सीरिज आणि टेस्ट सीरिजच्या सुरुवातीच्या २ मॅच मुकला होता. पण आता बुमराह फिट झाला आहे. भारताचे हे तीन खेळाडू फिट घोषित करण्यात आले असले तरी विराट कोहलीच्या फिटनेसबाबत मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
पाठदुखीमुळे विराट दुसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाचा काही भाग आणि चौथ्या दिवशी विराट कोहली फिल्डिंगला आला नव्हता. फिल्डिंग न केल्यामुळे विराटला दुसऱ्या इनिंगमध्ये त्याच्या नेहमीच्या चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येता आलं नव्हतं. दुसऱ्या इनिंगमध्ये अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर आणि विराट पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. जास्त क्रिकेट खेळल्यामुळे पाठीच्या खालचा भाग दुखायला लागल्याची प्रतिक्रिया विराटनं दिली होती. तसंच तिसऱ्या टेस्टसाठी फिट होऊ असा विश्वासही त्यानं व्यक्त केला होता. पण विराटच्या फिटनेसबद्दल अजून कोणतीच माहिती मिळालेली नाही.
विराट कोहली तिसऱ्या टेस्टसाठी फिट झाला नाही तर अश्विनकडे कर्णधारपद दिलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरु आहे. खरंतर अजिंक्य रहाणे भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार आहे पण रहाणेचा सध्याचा फॉर्म बघता त्याच्यावर कर्णधारपदाचा आणखी दबाव देण्यात येईल का असा प्रश्न आहे.
अश्विननं दोन टेस्ट मॅचमध्ये ७ विकेट घेतल्या आहेत तसंच ८५ रनही केल्या आहेत. या सीरिजमध्ये धवन, विजय, राहुल, रहाणे आणि कार्तिक या बॅट्समनपेक्षाही अश्विनच्या रन जास्त आहेत.
हेही वाचा : Ramesh Powar has been appointed Head Coach of the Indian women’s cricket Team