नागपूर : शहरात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यादृष्टीने झोनमधील प्रत्येक प्रभागात फवारणीवर विशेष लक्ष द्या. प्रत्येक भागांमध्ये फवारणी गाडी पोहोचावी याकडे लक्ष देऊन फवारणीचा वेळही वाढवून घ्या, असे असे निर्देश मनपा आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी दिले.
आरोग्य समितीच्या झोननिहाय बैठकीअंतर्गत बुधवारी (ता. २६) धंतोली झोन कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांच्यासह धंतोली झोनच्या सभापती विशाखा बांते, नगरसेवक विजय चुटेले, नगरसेविका लता काटगाये, सहायक आयुक्त स्मिता काळे, वैद्यकीय अधिकारी विजय जोशी यांच्यासह झोनमधील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये आरोग्य सभापती मनोज चापले यांनी धंतोली झोनअंतर्गत असलेल्या डेंग्यूच्या रुग्णांची माहिती घेतली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करा व ज्या घरी लारवी आढळली त्या घरी पुन्हा ती वाढू नये यासाठी विशेष काळजी घ्या, असेही निर्देश त्यांनी दिले. मनपातर्फे वॉर्डावॉर्डात वेळोवेळी फवारणी होते अथवा नाही, यावर लक्ष द्या. वार्डांमध्ये २०-२० दिवसांनी फवारणी करा व त्यासंबंधी प्रभागातील नगरसेवकांना दोन दिवसांपूर्वी माहिती देण्यात यावी. या सर्व प्रक्रियेचा अहवाल प्रत्येक आठवड्याला आरोग्य समिती सभापती व झोनचे सहायक आयुक्त यांना सादर करा, असेही सभापती मनोज चापले यांनी निर्देशित केले.
‘मोबाईल व्हॅन’ आजपासून सुरू
डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये भीती असून त्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेतर्फे ‘मोबाईल व्हॅन’ बुधवार (ता. २६) सुरू करण्यात आली आहे. या ‘मोबाईल व्हॅन’च्या माध्यमातून शहरातील चौकाचौकांसह शाळांमध्ये चित्रफित दाखवून डेंग्यूची विस्तृत माहिती व त्यापासून बचावासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे, असे यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी यावेळी सांगतिले. याशिवाय डेंग्यूच्या लारवीची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चमूने झोनमधील शाळांसह इतर भागातही जनजागृती करावी, असेही त्यांनी निर्देश दिले.
बाभूळखेडा रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर करा
बाभुळखेडा होमिओपॅथी रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली आहे. नागरिकांना उत्तम आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या रुग्णालयाची नव्याने निर्मिती होणे आवश्यक आहे. बाभूळखेडा होमिओपॅथी रुग्णालय इमारतीच्या बांधकामाची फाईल तयार करून त्या संबंधीचा प्रस्ताव सादर करा, असेही निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले. याशिवाय मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीच्या जागेवर अद्ययावत इमारत उभारण्यात येणार असून यासंबंधीही प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी निर्देशित केले.
अधिक वाचा : नागपुर : नफा कमावण्याकरिता निकृष्ट खाद्यतेलाची विक्री, ९२ हजारांचे खाद्यतेल जप्त