पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांनी जगातल्या सर्वात मोठ्या मोबाइल फॅक्टरीचे उद्घाटन केले. नोएडाच्या सेक्टर ८१ मध्ये सॅमसंगची ही फॅक्टरी आहे. सॅमसंग ने या फॅक्टरीसाठी ४,९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
‘या फॅक्टरीमुळे भारतीयांच्या सबलीकरणात योगदान आणि मेक इन इंडियाला गती मिळेल,’ असं मोदी उद्घाटनानंतर केलेल्या भाषणात म्हणाले. भारतात तयार झालेले मोबाइल जगात सर्वत्र निर्यात करण्यासाठी सॅमसंगने ‘मेक फॉर द वर्ल्ड’ चेही उद्घाटन केले आहे.
या युनिटच्या उद्घाटनावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभुदेखील उपस्थित होते. या युनिटच्या सहाय्याने सॅमसंग आपले मोबाइल उत्पादन दुप्पट करण्याचा विचार करत आहे. सध्या देशात सुमारे ७ कोटी स्मार्टफोन तयार करतं, २०२० पर्यंत ही संख्या १२ कोटींपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे.
सॅमसंग भारतात २००७ सालापासून मोबाइल उत्पादन करत आहे. सॅमसंग इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. सी. हाँग म्हणाले, ‘नोएडाची आमची ही फॅक्टरी जगातली सर्वात मोठी मोबाइल फॅट्करी आहे. हे भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ च्या यशाचं उदाहरण आहे. आम्ही या फॅक्टरीला जगातलं मोबाइल निर्यातीचं हब बनवणार आहोत.’
अधिक वाचा : Samsung Galaxy A6+ received a Rs. 2000 price cut in India