नागपूर : महिलांकडे उपजतच कला आहे. पाककला ही त्यातील महत्त्वाची कला आहे. त्यांच्यातील अशा कलांना तज्ज्ञांच्या अनुभवाचं कोंदण मिळाले तर उद्योजकता आणि उद्यमशीलता वाढेल. महिला बचत गटांसाठी वर्षभर वेगवेगळ्या उद्योगाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले तर त्यातून त्यांचे कौशल्य वाढेल आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर महानगरपालिका, महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण विभाग,दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग मैदानावर शहर समृद्धी उत्सवांतर्गत आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, हनुमाननगर झोन सभापती रुपाली ठाकूर, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती विशाखा मोहोड, समितीच्या सदस्य दिव्या धुरडे, सरीता कावरे, खान नसीम बानो, जिशान मुमताज अंसारी, रश्मी धुर्वे, वैशाली नारनवरे, नगरसेविका आयेशा उईके, वंदना भगत, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, बचत गटांनी उद्योग सुरू करावा, उत्पादन घ्यावे, त्यांच्या उत्पादनांची त्यांनी मार्केटिंग करावी आणि त्यातून आर्थिकदृष्ट्या सबल व्हावे या संकल्पनेतून महिला उद्योजिका मेळाव्याची संकल्पना मांडली गेली. तत्कालिन महापौर अर्चना डेहनकर यांनी सुरू केलेला हा मेळावा अविरत सुरू आहे. विदर्भातून येथे बचत गटाच्या महिला येतात. नागपूर महानगरपालिकेने या महिलांना आता प्रशिक्षण देऊन त्यांच्या कौशल्यात भर घालावी. महिलांनीही अभिनव कल्पना समोर आणाव्या. काहीतरी नवीन केले तर बाजारात त्याला मागणी असते. आता नागपुरातील महिलांना प्लास्टिक गोळा करण्याचा मंत्र दिला. नागपूर महानगरपालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे. ३ ते ४ रुपये किलोचे प्लास्टिक २० रुपये किलोने नागरिकांकडून विकत घ्यावे. डांबरी रोड ठेकेदारांना त्यांनी ३० रुपये दराने विकावे. आता डांबरी रस्त्यांमध्ये प्लास्टिकचा वापर करणे बंधनकारक केले आहे. त्याचा फायदा या महिलांना होईल. असे कचऱ्यातून मिळकत करण्याचे नवनवीन प्रयोग करा, असा सल्ला ना. नितीन गडकरी यांनी दिला. नागपूर महानगरपालिकेने दिव्यांग बांधवांना ई-रिक्षाचे वाटप केले, याचा आपणाला अधिक आनंद असल्याचा गौरवोल्लेख त्यांनी केला. नागपूरकरांनी या महिला उद्योजिका मेळाव्याला भेट देऊन आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तू विकत घेऊन उद्यमशील महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन यावेळी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महिला उद्योजिका राष्ट्रनिर्माणासाठी मदत करते. घरात जर उद्योजिका असली तर घरातील बालकांवर आपसूकच चांगले संस्कार घडतात. नागपूर महानगरपालिकेने आयोजित मेळाव्यासाठी सातदिवस पुरसे नाहीत. महिला बचत गटांच्या महिलांना महिला बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण मिळावे यासाठी कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र आणि बाजारपेठ मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. राज्य शासनाच्या मदतीने लवकरच नागपुरात महिला बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी खास मार्केट तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. महिला घराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करतात. त्यामुळेच व्यवसायतही त्या उत्तम लीडर ठरू शकतात. हेच हेरून नागपूर महानगरपालिकेने महिला बचत गटांची बांधणी सुरू केली. त्यांना उद्योग करण्यासाठी सहकार्य केले. आता त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे महिला उद्योजिका मेळावे आयोजित करून त्यांच्या व्यवसायाला एक दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहे. मनपाच्या महिला व बालकल्याण समितीचे यासाठी त्यांनी अभिनंदन केले.
प्रास्ताविक महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी महिला व बालकल्याण समितीने वर्षभर केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून ५०० महिलांना वर्षभरात उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून कार्य सुरू आहे. ३८ प्रभागात बांबूच्या स्टॉलवरून महिला बचत गटाच्या महिला पौष्टिक भोजन देतील. महिलांचे बॅँड पथक, महिलांचे भजन मंडळ यासाठी टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. शहरातील गरीब वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महिला सक्षमीकरणाची मशाल पेटवून महिला उद्योजिका मेळाव्याचे उद्घाटन केले. महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा बलूनही ना. गडकरी यांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आला. यानंतर ना. नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार व अन्य मान्यवरांचे स्मृतिचिन्ह व तुळशी रोप देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन स्मिता खनगई यांनी केले. आभार कविता खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाला महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, उद्योजक, गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.
कर्तृत्वाचा गौरव
यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. शहरातील कुत्र्यांसाठी निवारा तयार करणाऱ्या स्मिता मिरे, बाईकवरून हिमालय, मानस सरोवर अशी भ्रमंती करणाऱ्या गौरी डोळस, मुस्लीम महिला, मुलींच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या रुबीना पटेल, अज्ञान महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या संगीता राऊत, मूक-बधीर असतानाही श्रिया प्रकाश खानझोडे यांचा सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता.
सांगितिक मेजवानी, विविध उत्पादनांचे स्टॉल्स
महिला उद्योजिका मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी उपस्थितांसाठी सांगितिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. कलावंतांनी एकापेक्षा एक सरस गीते गाऊन रसिकांना रिझविले. मेळाव्यात सुमारे ३०० स्टॉल्स लागले असून महिला बचत गटांची उत्पादने विक्रीस उपलब्ध आहेत. मेळावा १२ जानेवारीपर्यंत असून प्रदर्शन दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत तर दररोज सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
अधिक वाचा : ‘26 वें ऑरेंज सिटी क्राफ्ट मेले का शानदार उद्घाटन’