नागपूर : ‘सत्य, अहिंसा आणि शांती’ हा मार्ग तथागत गौतम बुद्धाने जगाला दाखविला. त्यांनी दाखविलेला मार्ग हा विश्व कल्याणाचा मार्ग आहे, असे प्रतिपादन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवाडकर यांनी केले.
दीक्षाभूमीवर आयोजित पाच दिवसीय बुद्ध महोत्सव चा बुधवारी सायंकाळी शुभारंभ झाला. २७ जानेवारीपर्यंत बुद्ध संस्कृतीचे दर्शन या महोत्सवानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. यंदा आयोजनाचे हे नववे वर्ष आहे.
यानिमित्ताने बुद्धिस्ट फ़िल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन प्रसिद्ध नाटककार व चित्रपट कथालेखक शैलेश नरवड़े आणि कलादालनाचे उद्घाटन मानवाधिकार कार्यकर्त्या डॉ. विमल थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विमल थोरात म्हणाल्या. हिंसा संपविण्यासाठी बुद्धाशिवाय दुसरा मार्ग नाही. बुद्धधम्म हा विश्वधम्म आहे. बुद्धाचे विचार हे जगाला शांतीचे विचार दाखविणारे आहेत.
शैलेश नरवडे म्हणाले,’बुद्ध महोत्सव’ बहुजन समाजामध्ये व्हायला पाहिजे. ही बहुजन समाजाची गरज आहे. या समाजाने अशा महोत्सवाला प्रोत्साहित करायला पाहिजे. याप्रसंगी पोलिस उपायुक्त नीलेश भरणे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास ग़जघाटे, एन. आर. सुटे यांनीही विचार व्यक्त केले व बुद्ध महोत्सवाबद्दल कौतुकोद्गार काढले.
कार्यक्रमाचे उद्घाटन त्रिसरण पंचशीलानंतर अनिल कवडे रचित व स्वरबद्ध केलेल्या बुद्ध महोत्सवाच्या ‘थीम सॉंग’ने झाले. उद्घाटनाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सुनील तलवारे यांनी ‘संविधानिक मूल्यांनुसार बौद्ध संस्कृतीची पुनर्स्थापना करणे’ हे महोत्सवाचे एक उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी विचारपीठावर धम्मचारी नागकेतु, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राचे उपसंचालक पारखी, धम्मचारी ऋतायुष, रत्नदर्शी, साधनारत्न, धम्ममित्र भावना सोनावणे, आभा बोरकर, रितू धोंगड़े, आश्विन कापसे, डॉ. त्रिलोक हजारे आदी उपस्थित होते.
उद्घाटन सत्रानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ मृणाल थुलकर हिने सादर केलेल्या ‘पुष्पांजली अर्पित बुद्ध पूजा‘ या भरतनाट्यमवर आधारित नृत्याने झाला. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते ३०० पेक्षा अधिक शाळकरी मुलांनी एकाच वेळी गायिलेले ‘हीच आमुची प्रार्थना हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे’ आणि ‘राहो सुखाने है मानव इथे’ हे मैत्रिगीत सादर केले. या गीतात शहरातील १४ शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यावेळी या शाळांतील शिक्षक, प्राचार्य, संचालक, तसेच विद्यार्थ्यांचे पालक प्रामुख्याने उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचा शेवट मॉडर्न स्कूलच्या सुंदर अशा झंकार या बँडने झाला. संचालन सरला वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक प्रिया नील यांनी केले. आभार वंदना मांडवकर यांनी मानले.
अधिक वाचा : थरार राष्ट्रगीताचा : हजारो नागपूरकर एकसाथ राष्ट्रगीताद्वारे पुन्हा घडवणार इतिहास!