नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे आरोग्य, शिक्षण यासारख्या अनेक सेवा दिल्या जातात. मात्र त्यांना सतत नावच ठेवले जाते. मात्र या सेवांना आधुनिकतेची जोड देण्यासाठी टाटा ट्रस्टने दिलेला मदतीचा हात मनपाची नवी ओळख निर्माण करणार आहे. टाटा ट्रस्टने मनपा रुग्णालयांमधील सुविधांचा केलेला कायापालट हा नागरिकांचा मनपाच्या आरोग्य सेवेबाबतचा दृष्टिकोन बदलविणारा ठरणार आहे, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
नागपूर महानगरपालिका व टाटा ट्रस्टच्या सहकार्याने सदर येथील मनपा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अद्ययावत केंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळेचे सोमवारी (ता. १३) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी आरोग्य समिती सभापती मनोज चापले, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, महिला व बाल कल्याण समिती सभापती प्रगती पाटील, ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर सुनील अग्रवाल, नगरसेवक किशोर जिचकार, निशांत गांधी, नगरसेविका शिल्पा धोटे, वैद्यकीय आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे, सदर रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, दंत रोग तज्ज्ञ डॉ. साकीब पटेल आणि डॉ. शबिना पटेल, डॉ. अंजुम बेग, डॉ. विजय जोशी, डॉ. आंबेराय, डॉ. चारू बाहेती, डॉ. सुरेश बत्रा, टाटा ट्रस्टचे सिनियर पॅथॉलॉजिस्ट डॉ. टिकेश बिसेन, डॉ. रिजेश बोस, अमर नावकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महापालिकेकडे सुविधा आहेत. मात्र तोकड्या निधीअभावी त्या अद्ययावत करता येत नाही. नागपूर महानगरपालिका व टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये ६ डिसेंबर २०१७ ला सामंजस्य करार झाला. या करारांतर्गत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण व आधुनिकीकरणासह केंद्रीय प्रयोगशाळा उघडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या अंतर्गत टाटा ट्रस्टने उचलेले पाउल हे स्तुत्य आहे. मात्र त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात दर्जा टिकून राहिल. यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनीही लक्ष द्यावे, असे त्या म्हणाल्या.
महापौरांनी केली रक्त तपासणी
केंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळेच्या उद्घाटनानंतर महापौर नंदा जिचकार यांनी संपूर्ण प्रयोगशाळेची माहिती जाणून घेतली. यावेळी महापौरांनी स्वत: रक्त तपासणी करून पॅथॉलॉजीचा शुभारंभ केला. या अद्ययावत पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत नागरिकांना एकाचवेळी विविध ४९ तपासणी करता येणार आहेत. यासाठी नागरिकांना आधी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना करावयाच्या असलेल्या चाचण्यांचे शुल्क भरावे लागेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिवसभरातच रिपोर्टही मिळणार आहे. विशेष म्हणजे, नोंदणीपासून ते संपूर्ण प्रक्रियेबाबतची भरलेल्या शुल्कासह माहिती नागरिकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे.
२० ते १५० रुपयांत तपासणी
मनपा रुग्णालय व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना गरज असल्यास प्रयोगशाळा तंत्रज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त किंवा लघवीचे नमुने घेतील. ह्या कार्यक्रमांतर्गत हे नमुने केंद्रीय प्रयोगशाळेत पोहोचविले जातील. केंद्रीय प्रयोगशाळेत तज्ज्ञ व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नमुन्यांची तपासणी करून रिपोर्टस् संबंधित मनपा किंवा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येईल. विशेष म्हणजे, या सर्व चाचण्यांसाठी अत्यल्प शुल्क आकारण्यात येणार आहे. तपासणीसाठी नोंदणी शुल्क १० रुपये असून इतर तपासण्या या २० रुपयांपासून ते जास्तीत जास्त १५० रुपयांपर्यंत आहेत. मोठमोठ्या खासगी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत हजारो रुपये मोजून कराव्या लागणाऱ्या तपासण्या आता अद्ययावत तंत्रज्ञानासह अत्यल्प दरात नागपूरकरांना मिळणार आहेत.
दंत विभागाची महापौरांकडून पाहणी
सदर रोगनिदान केंद्र येथे अल्पदरात दंतचिकित्सा सेवा पुरविली जाते. येथील मनपा रुग्णालयातील अत्याधुनिक दंत विभागाचीही महापौर नंदा जिचकार यांनी पाहणी केली. दंत विभागातील सर्व सुविधांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. दंत विभागात दातांविषयीचे सर्व उपचार अत्यंत कमी दरात विभागात केले जातात. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना विभागात नि:शुल्क उपचार दिले जात असून वेळोवेळी दंत तपासणी शिबिर घेण्यात येतात, अशी माहिती यावेळी दंत विभागाचे प्रभारी डॉ. साकीब पटेल व डॉ. शबिना पटेल यांनी यावेळी महापौरांना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळेबाबत विस्तृत माहिती दिली. नागपुरात टाटा ट्रस्टने ‘मॉडर्न’ रुग्णालयांची संकल्पना रुजविली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. टाटा ट्रस्टच्या पुढाकारातूनच नागपूरकरांना अत्यल्प दरात अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन मनपा जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.
अधिक वाचा : अनधिकृत बांधकामाचा अहवाल सात दिवसांत सादर करा! – विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम यांचे निर्देश